
चेन्नई – जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यातील जगज्जेतेपदाच्या लढतीला शनिवारपासून चेन्नईतील हयात रिजन्सी हॉटेलमध्ये सुरुवात होत आहे. पाच वेळचा विजेता आनंद जेतेपद राखण्यास तसेच प्रथमच जगज्जेतेपदाची लढत खेळणारा कार्लसन आनंदची मक्तेदारी मोडीत काढण्यास उत्सुक असून या लढतीकडे अवघ्या बुद्धिबळ जगताचे लक्ष लागून राहिले आहे.
४४ वर्षीय आनंद आणि २२ वर्षीय कार्लसन यांच्यातील लढतीची तुलना १९७२ मधील बॉबी फिशर आणि बोरिस स्पास्की यांच्यातील ऐतिहासिक लढतीशी केली जात आहे. अव्वल मानांकित आणि फॉर्मात असल्याने कार्लसनच्या पारडय़ात अनेकांनी आपली मते टाकली तरी प्रदीर्घ अनुभव आणि शांत स्वभावाच्या आनंदसमोर त्याचीही मोठी परीक्षा असेल.
जगज्जेतेपदाच्या लढतीतील सर्व डाव क्लासिक पद्धतीप्रमाणे खेळले जातील. प्रत्येक बुद्धिबळपटूला पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे मिळतील. पुढील २० चालींसाठी ६० तसेच उर्वरित खेळासाठी १५ मिनिटे मिळतील. ६१व्या चालीनंतर प्रत्येक चालीसाठी ३० सेकंद वाढवून मिळतील.प्रथम साडेसहा गुण मिळवणारा विजेता ठरेल. १२व्या डावापर्यंत जेतेपदाची कोंडी न फुटल्यास ‘टाय ब्रेक’चा अवलंब केला जाईल. विजेत्याला एकूण रकमेच्या ६० टक्के रक्कम बक्षिस म्हणून मिळेल.
