धनत्रयोदशीला हिरे प्लॅटिनम खरेदीला अधिक पसंती

मुंबई – सोने चांदीच्या दरात सतत होत असलेल्या चढउताराचा परिणाम म्हणून केवळ ग्राहकांनीच नव्हे तर गुंतवणुक दारांनीही यंदाच्या धनत्रयोदशीला वेगळा ट्रेंड स्वीकारला असल्याचे सराफ व्यावसायिक सांगत आहेत. यंदा ग्राहक आणि गुंतवणूकदार यांनी सोने चांदीऐवजी प्लॅटिनम, हिर्‍याचे दागिने व व्हाईट गोल्डला अधिक पसंती दिली आहे.

असोचेमने या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण केले त्यात मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगलोर, चंदीगढ, अहमदाबाद, डेहराडून, हैद्राबाद येथील सुमारे ३५० सराफ व्यावसायिकांना समाविष्ट करून घेतले होते. यंदाच्या दिवाळीचा नवा ट्रेंड समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले. त्या ग्राहकांच्या बदलत्या पसंतीला प्राधान्य देऊन ७६ टक्के सराफांनी पारंपारिक सोने चांदी ऐवजी प्लॅटिनमचे दागिने, प्लॅटिनममधील हिर्‍याचे दागिने व व्हाईट गोल्डचे दागिने बनविण्यास अधिक प्राधान्य दिल्याचे आढळले.

असोचेमचे महासचिव डी.एस. रावत म्हणाले की गेली कांही वर्षे प्लॅटिनम व हिर्‍यातील गुंतवणुकीस गुंतवणूकदारही प्राधान्य देताना दिसत आहेत. सोने चांदीच्या बेभरवशी दर चढउतारापेक्षा यात गुंतवणक दारांना अधिक परतावा मिळण्याची खात्री वाटते आहे. यंदा हिर्‍याच्या दागिन्यांची मागणीही २५ टक्कयांनी वाढली असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.