स्टीव्ह जॉब्जचे जुने घर आता ऐतिहासिक वारसा

सिलिकॉन व्हॅलीतील ज्या घरात अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज वाढला व ज्या घरात त्याने पहिले १०० संगणक तयार केले ते घर आता शहराच्या ऐतिहासिक मालमत्ता यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. लॉस अल्टोस शहरातील हिस्टॉरिक कमिशनने या निर्णयाला एकमताने मान्यता दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या रँच स्टाईलच्या घरात यापुढे कोणतेही नवे बांधकाम अथवा दुरूस्ती करताना या कमिशनची  परवागनी घ्यावी लागणार  आहे.

वास्तविक हे घर स्टीव्हची बहिण पॅट्रिशिया हिच्या मालकीचे आहे. स्टीव्ह या घरात १९६८ साली रहायला आला होता. स्टीव्ह येथेच वाढला आणि याच घरात त्याने आपली बहीण पॅट्रिशिया व अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह वोझनिक यांच्या सहकार्याने पहिले १०० अॅपल आय संगणक बनविले होते. त्यातील ५० शेजारीच दुकानात प्रत्येकी ५०० डॉलर्सला विकलेही गेले होते. त्यानंतर १९७६ साली स्टीव्हने पहिली पार्टनरशीप अॅपल मध्ये याच घरात केली. ही कंपनी येथेच सुरू झाली व नंतर ती क्युपरटिनोला हलविली गेली असे समजते.