वॉशिंग्टन – ओबामा केअर’ या आरोग्य क्षेत्रातील अत्यंतिक खर्चिक मात्र महत्त्वाकांक्षी विधेयकामुळे शटडाऊन आणि बहिष्काराला सामोरे जावे लागले त्याच्या प्रचारासाठी ओबामा भलेही ऑनलाईन मोहीम राबवणार असले तरी प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये मात्र अद्यापही या वादग्रस्त विधेयकाबद्दल अढी कायम असून ओबामा यांनी बुधवारी पुन्हा एकदा संपूर्ण काँग्रेसला या विधेयकासाठी समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
या विधेयकाला समर्थन मिळविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निवडलेला ऑनलाईन फंडा फार काम करेल, याची शक्यता वाटत नाही कारण ज्या दिवशी या विधेयकावरील चर्चेवरून काँग्रेसमध्ये विरोधी पक्षाने सरकारवर बहिष्कार टाकला त्या दिवशीच या वेबसाईटचे काम सुरू झाले होते. मात्र रिपब्लिकन्सनी ओबामा यांना शटडाऊनला तर सामोरे जायला लावलेच मात्र सरकारवरील बहिष्कार टाकण्याचे अस्त्र वापरून काँग्रेसही बंद पाडली. या पेच प्रसंगातून कसा तरी मार्ग निघाल्यामुळे ओबामा थोडेसे रिलॅक्स झाले पण अद्यापही त्यांच्यासमोर या विधेयकाला समर्थन मिळवण्याचे आव्हान कायम आहे.
ऑनलाईन मोहिमेद्वारे जनसमर्थन मिळवण्याच्या मार्गातही आता प्रचंड अडथळे येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. कारण या वेबसाईटवरून जनजागृती करणा-या ओबामांना मंगळवारीच याचा प्रत्यय आला आणि ओबामा यांनीच ज्या सहज प्रकारे या वेबसाईटचा प्रतिसाद मी गृहित धरला होता त्या प्रकारे ती चालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि म्हणूनच आपण काँग्रेसला पुन्हा एकवार समर्थनाचे आवाहन करीत आहे, असे ओबामा यांनी स्पष्ट केले आहे.