वाशिंग्टन (वृत्तसंस्था) – पाकिस्तानचे भारताबरोबर असलेले संबंध आणि काश्मिर प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी सखोल चर्चा केली. या चर्चेत मुंबईवर हल्ला करणा-या पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात अद्याप खटला का भरवला नाही असा जाब ओबामा यांनी नवाझ शरीफ यांना विचारला.
26/11 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यास अद्याप का सुरूवात झालेली नाही असा प्रश्न ओबामा यांनी या बैठकीदरम्यान उपस्थित केला. अन्य देशांमध्ये अतिरेकी कारवाया करण्यात उद-दावा या दहशतवादी संघटनेचा हात असणे आणि ओसामा बिन लादेनचा शोध घेण्यास अमेरिकेला मदत करणा-या डॉ शकील आफ्रिदी याला केलेली अटक याबाबतही ओबामा यांनी शरीफ यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले.
भारताबरोबर अनेक दशकांपासून असलेले तणावपूर्व संबंध सुधारण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब शरीफ करत आहेत, असे ओबामा यांना वाटते. भारत – पाकमधील तणावपूर्ण संबंधांमुळे दोन्ही देशांनी अब्जावधी रुपये फक्त शस्त्रांवर खर्च केले. हे पैसे शिक्षण व समाजकल्याणासाठी वापरता आले असते असे ओबामांना सुचवले. या दोन्ही शेजा-यांमध्ये संवाद सुरू राहिला पाहिजे अशी अपेक्षा ओबामांनी यावेळी व्यक्त केली. याचा उपयोग उपखंडातच नाही तर जागतिक शांततेसाठीही ते फायद्याचे ठरेल असे मत ओबामा यांनी व्यक्त केले. दोन्ही देशांमध्ये काश्मिरसह असलेले सर्व मतभेद हे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यावर भर देण्याची गरज असल्याचे ओबामा सांगतात.