प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची

मुंबई – प्रकल्प रखडल्याची ओरड राज्यात का होत आहे याचा गांभीर्याने विचार आपण केला पाहिजे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून रखडलेले प्रकल्प ताबडतोब पूर्ण करा. अशा शब्दात राज्यपाल के.शंकरनायणन यांनी आज सरकारला खडे बोल सुनावले. अभियंता दिनानिमित्त रविंद्र नाट्य मंदीर येथे राज्यपालांच्या हस्ते जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा या विभागातील 25 अभियंत्यांना सन्मानीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, सार्वजनिक उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर, पाणीपुरवठामंत्री दिलीप सोपल, पाटबंधारेमंत्री शशिकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. राज्यातील रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांबाबत राज्यपालांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. कोणते प्रकल्प हाती घ्यायचे, त्याचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा हे अधिकार सरकारचे आहेत. त्यामुळे प्रकल्प का रखडले याचा विचार सरकारने करायला हवा. जे प्रकल्प हाती घेता ते त्यासाठी पुरेसा निधी आहे की नाही याचाही विचार केला पाहिजे. प्रकल्प सुरू होतात. पण ते वेळेत पूर्ण होत नाही. यामुळे जनसामान्यांत तसेच लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. असे त्यांनी सांगितले.

अभियंता देश उभारणीतील महत्त्वपूर्ण घटक असून विकास कामांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. असा गौरव राज्यपालांनी केला. आपल्या राज्यात चांगले रस्ते आहेत. पायाभूत सुविधादेखील योग्य प्रकारच्या आहेत. त्यात अजून वाढ होणे आवश्यक आहे. विकासाचे श्रेय हे इतरांबरोबरच अभियंत्यांनादेखील आहे. कारण त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू, रस्ते, धरण यामुळे राज्याचा कायापालट होण्यास मदतच झाली आहे. असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment