चेन्नई – कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील पहिल्या संयत्रामध्ये सोमवारी रात्री वीजनिर्मितीला सुरुवात झाली. हे संयत्र दक्षिण पॉवर ग्रीडला जोडण्यात आले आहे. भारत-रशिया सहकार्यातून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी अणुऊर्जा प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती हा मैलाचा दगड ठरला आहे.
अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या संयत्रामधून पहाटे पावणे तीनच्या सुमारास 75 मेगावॅट वीजनिर्मितीला सुरुवात झाल्याची माहिती कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प संचालक आर. एस. सुंदर यांनी दिली. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या रशिया दौ-यादरम्यान वीजनिर्मितीला सुरुवात होणे हा योगायोग असल्याचे बोलले जात आहे.
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भातील सर्व कायदेशीर अडथळे व त्रुटी दूर करण्याचा निर्णय भारत व रशियाने सोमवारी घेतला होता. कुडनकुलम येथील तीन व चार क्रमांकाच्या अणूभट्टया उभारण्यासंबंधी भारत व रशियादरम्यान काही मुद्दयांवर मतभेद होते. विशेषत: भारतीय कायद्यानुसार उत्तरदायित्वाच्या कलमांना रशियाचा विरोध होता. या सर्व अडचणींवर मात करून करार पूर्ण करण्याचा निर्णय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी घेतला.
प्रकल्पातील पहिल्या युनिटचे काम यावर्षी 13 जुलै रोजीच सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पातून वीजनिर्मितीत 50 टक्के वाढ होऊन 500 मेगावॅट वीजनिर्मिती होईल, असे अणुऊर्जा नियामक मंडळाने ऑगस्टमध्ये सांगितले होते. कुडनकुलम येथील तिरुनेवेली येथे भारतीय अणुऊर्जा महामंडळ लिमिटेड (एनपीसीआयएल) रशियाच्या सहकार्याने एक हजार मेगावॅटचे दोन युनिट सुरु करत आहे.