भट्ट कॅम्पच्या राज-३ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशामुळे बंगाली बाला बिपाशा बासूची कारकीर्द पुन्हा बहारणार असे वाटत असतानाच आत्मा चित्रपटाकडे प्रेक्षकांनी सरळसरळ पाठ फिरविल्याने तिचा हिरमोड झाला आहे. आत्माच्या अपयशाने तिला पुन्हा तिथेच आणून ठेवले आहे, ज्या ठिकाणी ती राज-३च्या आधी होती.
चित्रपट तिच्या यादीतून दिवसेंदिवस दूरच होत आहेत. एक चित्रपट हाती असला तरी त्याचाही तिला फारसा भरवसा वाटत नाही आणि नवा चित्रपट मिळण्याचीही काहीच चिन्हे दिसत नसल्याने हैराण असलेली बिपाशा पुन्हा फिटनेस डीव्हीडी आणि सीडी लाँच करण्याच्या दिशेने मेहनत घेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत बिपाशाला विचारणा केल्यावर ती भलतेच उत्तर देत प्रसारमाध्यमांवर खापर फोडते. या सगळय़ा बातम्या माध्यमांकडूनच पसरविल्या जातात व नंतर पुन्हा आमच्याकडे येऊन त्याची खात्रीही करून घेतात. मागील सहा वर्षांपासून मी एका वर्षाला फक्त तीनच चित्रपटात काम करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यापेक्षा मला जास्त काहीच नको आणि तशी माझी कुठली इच्छाही नाही.
आयुष्यात यापेक्षाही अनेक गोष्टी असून त्यांचाही मला आनंद घ्यायला आहे, असे ती सांगते. बिपाशा सध्या श्रीजीत विक्रमचा क्रीएचर्स नामक चित्रपट करत आहे. बंगालीत मोठे नाव असलेला श्रीजीतसोबत काम करण्याची तिची फार दिवसांपासूनची इच्छा होती. त्याच्यासोबत तिची चर्चा झाली असून लवकरच या चित्रपटाचे काम सुरू होईल. मात्र त्याआधी बिपाशा आपली तिसरी डान्स व फिटनेसची डीव्हीडी बाजारात उतरविणार आहे. फिटनेस बिपाशाची आवड आहे. त्यामुळे अशी डीव्हीडी काढण्यात तिला काहीच वावगे नाही. मात्र तिचे पहिले प्राध्यान्य हिंदी चित्रपटांनाच असेल, असेही तिने स्पष्ट केले.