‘फॅशन’च्या सिक्वेलमध्ये प्रियंकाऐवजी आता दीपिका

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील आघाडीच्या नायिका असलेल्या अभिनेत्री दीपिका पादूकोन व अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यात रेस लागली आहे. या ना त्या कारणाने दीपिका आणि प्रियंका यांच्यात चढाओड सुरू असते. परवाच रामलीला मधील प्रियांकाचे आयटम सॉंग हिट ठरू नये म्हणून दीपिकाने नवस केले आहेत. त्यातच आता ‘फॅशन’च्या सिक्वेलमध्ये प्रियंकाची जागा आता दीपिका घेण्यास उत्सुक असल्यालचे समजते.

मधुर भांडारकरच्या २००८ साली आलेल्या ‘फॅशन’मुळे प्रियांका चोप्राला स्वतंत्र ओळख मिळाली. तिच्या अभिनयाचे कौतुक तर झालेच; त्याचबरोबर सुपरहिट ठरलेल्या या सिनेमानंतर ती एकदम स्टारपदी जाऊन बसली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. आता ‘फॅशन’च्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली असून त्यात मात्र प्रियांकाऐवजी दीपिकाचा विचार मधुर भांडारकर करतोय, अशी जोरदार चर्चा आहे.

२००७ साली दीपिकाने ‘ओम शांती ओम’द्वारे पदार्पण केले आणि २०१३ सालात तर ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘रेस २’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ असे तीन सुपरडुपर हिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळेच बहुधा मधुरला ‘फॅशन’च्या सिक्वेलमध्ये प्रियांकाऐवजी दीपिकाच हवी आहे. आगामी महिन्यात प्रियांकाचा ‘क्रिश थ्री’ हा एकमेव सिनेमा प्रदर्शित होतोय. नंबर वनच्या स्पर्धेत प्रियांका असली तरी सध्या दीपिकाने तीन सुपरहिट सिनेमे देऊन आघाडी घेतली आहे, हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे आपल्या अभिनयाने प्रियांकाने ‘फॅशन’ गाजवला असला तरी सिक्वेलमध्ये मधुर तिला डावलून दीपिकाला घेतोय याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Comment