कुडानकुलम् प्रकल्पाचे पुढचे टप्पे पूर्ण करणार

मॉस्को – रशियाच्या सहकार्याने भारतात उभारल्या जात असलेल्या तामिळनाडूतील कुडानकुलम् येथील अणु ऊर्जा प्रकल्पाचे तीन आणि चार हे दोन टप्पे पूर्ण करण्याचा निर्धार भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या दोघांच्या चर्चेत व्यक्त करण्यात आला. अणु ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भातील दायित्वाच्या संबंधातील कायद्याच्या काही अडचणी या प्रकल्पाच्या आड येत आहेत. त्या अडचणी दूर करून या दोन टप्प्यांना गती देण्याचे या दोन नेत्यांच्या चर्चेत ठरले.

कुडानकुलम् येथील अणु ऊर्जा प्रकल्पाच्या दोन टप्प्यांना मागेच हिरवा बावटा मिळाला आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून येत्या दोन महिन्यात त्यातून वीज निर्मिती सुरू होणार आहे. दुसर्‍या टप्प्याची उभारणी लवकरच सुरू होईल. १९८७ साली या दोन देशांच्या दरम्यान या प्रकल्पाबाबत करार झाले होते. तेव्हा तो चार टप्प्यात पूर्ण करण्याचे ठरले होते. पण तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आहेत. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि पुतीन हे दोघे स्वत: लक्ष घालून या अडचणी दूर करतील, असे त्यांच्यात झालेल्या ९० मिनिटांच्या चर्चेत ठरले.

भारताचे कार्यकारी प्रमुख म्हणजे पंतप्रधान आणि रशियाचे कार्यकारी प्रमुख म्हणजे अध्यक्ष यांच्यात झालेली ही चौदावी शिखर बैठक आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि पुतीन या दोघात झालेली ही पाचवी बैठक आहे. कुडानकुलम्चा प्रकल्प हे भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे निशाण आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी त्याच्या पूर्ततेवर लक्ष दिले पाहिजे यावर या दोघांच्या बैठकीत भर देण्यात आला. त्या व्यतिरिक्त संरक्षण, ऊर्जा, उच्च तंत्रज्ञान, गुंतवणूक, अवकाश संशोधन, विज्ञान, शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये या दोन देशातले सहकार्य सतत वृद्धिंगत करण्याबाबत एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.