नरेंद्र मोदीं हिटलर- मनिष तिवारी

मुंबई: नरेंद्र मोदींची तुलना जर्मनीचा हुकुमशहा हिटलरशी करून काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी आता नव्या वादाला तोंड फोडले आहे. भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा वापर देशाच्या ब्रॅन्डिंगसाठी करण्याची कल्पना मोदींनी मांडली होती. त्याचा समाचार घेताना तिवारींनी ही टीकास्त्र सोडले आहे.

एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना मनिष तिवारी म्हणाले, ‘ज्या पद्धतीने बर्लिन ऑलिम्पिकचा वापर करुन हिटलरने जर्मनीचे ब्रॅण्डिंग केले आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींनी सिनेसृष्टीचा वापर देशाच्या ब्रॅण्डिगसाठी करण्याचा विचार मांडला आहे. नरेंद्र मोदींनी मुंबईतील एका कार्यक्रमात भारताच्या ब्रॅण्डिंगसाठी सिनेसृष्टीचा वापर करण्याचे म्हटले होते, तेव्हा माझ्या मनात विचार आला की १९३६ मध्ये अॅडॉल्फ हिटलरनेही ब्रॅण्डिंगसाठी बर्लिन ऑलिम्पिकचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. स्वस्तिकचे ते प्रतिक जगभरात आताही अनेक लोकांना भयानक स्वप्नांच्या रुपात घाबरवते.’

तिवारी यांच्या टीकेवर भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी प्रत्युत्तर दिले. ‘भारताचा इतिहास पाहता देशाने फक्त एकच हुकुमशहा पाहिला आहे आणि त्या इंदिरा गांधी होत्या. त्यादेखील काँग्रेसच्या इतिहासाचा भाग होत्या,’ असे त्यांनी स्पतष्ट केले आहे.