जीओएसई उपग्रह इंधन संपल्याने पृथ्वीवर कोसळणार

पृथ्वीच्या घनतेसंदर्भातली निरीक्षणे नोंदविण्यासाठी मार्ज २००९ मध्ये अवकाशात सोडण्यात आलेला ग्रॅव्हिटी ओशन सक्र्युलेशन एक्स्प्लोरर हा उपग्रह इंधन संपल्याने २६ आक्टोबर नंतर कधीही पृथ्वीवर कोसळेल असे युरोपियन स्पेस एजन्सीने जाहीर केले आहे. सध्या हा उपग्रह २६० किमीच्या कक्षेत फिरत आहे मात्र इंधन संपताच त्याचे इंजिन बंद होईल व इंधन दाब शून्यावर येताच या उपग्रहाचे ४० ते ५० तुकडे पृथ्वीवर आदळतील असे ख्रिस्तोफर स्टेगस या संशोधकांचे म्हणणे आहे.

उपग्रहाच्या टाकीतील इंधन संपल्यानंतर इंधन दाब २६ आक्टोबरपर्यंत शून्यावर येईल असे सांगून स्टेगस म्हणाले की या उपग्रहाचे तुकडे समुद्रात कोसळतील की जमीनीवर ते आत्ताच सांगणे कठीण आहे. इंधन संपताच उपग्रह कक्षेत अस्थिर होईल आणि कक्षा सुटताच त्याचे तुकडे होतील. एकदा पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर कोसळायच्या आधी कांही तास त्याचे नक्की ठिकाण सांगणे शक्य आहे.

दरवर्षी अंदाजे १०० टन मानवनिर्मित मलबा अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात परत येत असतो. त्यातील कांही तुकडे वातावरणात शिरतानाच घर्षणाने जळून जातात व २० ते ४० टन वजनाचे तुकडे पृथ्वीवर आदळतात. मोठे तुकडे घर्षणात पूर्ण नष्ट होत नसल्याने ते आदळतात असेही ते म्हणाले.