भगतसिंगांच्या कुटुंबियात मोदींवरून मतभेद

लुधियाना – देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले शहीद भगतसिंग यांनी फाशी होण्यापूर्वी तुरुंगात असताना लिहिलेल्या आठवणीवर आधारलेले एक पुस्तक नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित करावे की नाही यावरून भगतसिंगांच्या कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाला आहे. हे पुस्तक प्रकाशित करणारे भगतसिंग यांच्या बंधूंचे नातू यादविंदरसिंग संधू यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण सुद्धा दिले आहे. चंडिगढ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तशी घोषणाही केली.

असे असले तरी भगतसिंगांच्या अन्य नातेवाईकांनी त्यांना विरोध केला आहे. लुधियाना येथे वास्तव्यास असलेले भगतसिंगांचे पुतणे जगमोहनसिंग यांनी मोदींच्या उपस्थितीच्या विरोधात मोहीमच सुरू केली आहे. मेनस्ट्रीम या इंग्रजी साप्ताहिकात या विषयावर एक लेख प्रसिद्ध झाला आहे. शहीद भगतसिंग ज्या तत्वांसाठी लढले त्यांच्या विरोधात मोदी यांची तत्वे आहेत. त्यामुळे भगतसिंगांच्या पुस्तकाचे प्रकाशन मोदींच्या हस्ते होणे उचित होणार नाही, असे मत जगमोहनसिंग यांनी व्यक्त केले आहे.

भगतसिंगांच्या निकटच्या नातेवाईकांमध्ये या मुद्यावरून मतभेद जारी असतानाच भगतसिंगांच्या संबंधात लिखाण करणार्‍या काही लेखकांनी आणि अभ्यासकांनीही मोदींच्या उपस्थितीला विरोध केला आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील भारतीय भाषा या विषयाचे प्राध्यापक चमनलाल, शमसूल इस्लाम इत्यादी लेखकांचा त्यात समावेश आहे.

भगतसिंग यांचे प्रसिद्ध होत असलेले हे पुस्तक त्यांनी तुरुंगात लिहिलेल्या आठवणींवर आधारलेले आहे. त्यांना फाशी दिल्यानंतर इंग्रज सरकारने त्या वह्या भगतसिंगांचे कनिष्ठ बंधू कुलबीरसिंग यांच्या ताब्यात दिल्या. १९९० साली त्यावर आधारलेले हिंदी पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर पंजाबीत ते आले. पण आता मात्र २८८ पानांचे हे पुस्तक भगतसिंगांच्या हस्ताक्षरातल्या कागदांच्या स्कॅनिंगपासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकातून लोकांना भगतसिंगांचे हस्ताक्षर बघावयास मिळणार आहे. एका पानावर भगतसिंगांचे मूळ लिखाण आणि त्याच्या समोरच्या पानावर त्या लिखाणाची छापील प्रत अशा स्वरूपाचे हे पुस्तक आहे.