कोणी अस्पृश्य नाही : पवारांच्या विधानावर कॉंग्रेस नाराज

नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपूर येथे भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून राजकारणात कोणीही अस्पृश्य नाही, असे उद्गार काढल्यामुळे कॉंग्रेसच्या वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे. परंतु ही नाराजी जाहीरपणे व्यक्त न करता कॉंग्रेसच्या नेत्यांनी सारवासारवी सुरू केली आहे. पवारांना यातून काहीही सांगावयाचे नाही; कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर औपचारिकरित्या उचित असे काही तरी बोललेच पाहिजे म्हणून त्यांनी सहजपणे हे उद्गार काढले आहेत असे कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

कॉंग्रेसने काहीही सारवासारव केली असली तरी राजकीय वर्तुळात मात्र शरद पवार यांच्या या विधानाची चांगलीच दखल घेण्यात आली आहे. विविध पक्षांचे नेते पवारांच्या विधानाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पवारांच्या या विधानाला डावपेचात्मक महत्व आहे; त्यांना या विधानातून आपल्याशी मैत्री करणार्‍या कॉंग्रेस पक्षाला काही इशारा द्यायचा आहे असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी कॉंगेस आणि कॉंग्रेस यांच्यात संघर्ष जारी आहे. राष्ट्रवादीला २२ जागा हव्या आहेत, परंतु कॉंग्रेसचे नेते त्यांना १९ पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाहीत. असे असेल तर कॉंग्रेसने आपल्याला मित्र पक्ष म्हणून गृहित धरू नये असे पवारांनी गडकरी यांच्या कार्यक्रमातल्या या विधानातून सूचित केले आहे, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन् यांनी पवारांच्या या विधानावरून यूपी आघाडीतील मतभेद स्पष्ट झाले आहेत असे म्हटले. या आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेसच्या दादागिरीला वैतागले आहेत आणि त्यातूनच अस्वस्थ झालेल्या शरद पवारांनी हे उद्गार काढले आहेत असे सीतारामन् म्हणाल्या.