ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 72 धावांनी पराभव

पुणे- बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर पहिली लढत 72 धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. पाहुण्यांप्रमाणे यजमानांना चौफेर फटकेबाजी करता आली नाही. परिणामी 305 धावांचे मोठे आव्हान पेलताना भारताचा डाव 49.4 षटकांत 232 धावांत संपला.

वनडाउन विराट कोहली वगळता भारताच्या अन्य प्रमुख फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र त्याची अर्धशतकी खेळीही तितकी जबरदस्त नव्हती. 85 चेंडूंत 6 चौकारांसह 61 धावा त्याने केल्या. मात्र कोहलीची खेळी यजमानांतर्फे सर्वाधिक ठरली. तसेच त्याने सुरेश रैनासह (39) तिसर्‍या विकेटसाठी केलेली 71 धावांची भागीदारीही डावातील सर्वाधिक ठरली. ही जोडी परतल्यानंतर भारताच्या धावांचा वेग मंदावला. तसेच ऑस्ट्रेलियाचा विजयही निश्चित झाला.

वास्तविक पाहता तीनशेहून अधिक धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दमदार सलामी आवश्यक होती. मात्र शिखर धवन (7) आणि रोहित शर्माला झटपट सुरुवात करण्यात अपयश आले. रोहितने (42) कोहलीसह दुस-या विकेटसाठी 40 धावा जोडल्या. मात्र आणखी काही षटके खेळपट्टीवर टिकून राहणे, रोहितला जमले नाही. ऑस्ट्रेलियातर्फे तेज गोलंदाज जेम्स फॉकनरने तीन तसेच क्लिंट मॅककाय आणि शेन वॉटसनने प्रत्येकी दोन विकेट घेत गोलंदाजीत छाप पाडली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार जॉर्ज बेलीसह (85) सलामीवीर आरोन फिंचच्या (72) संयमी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 304 अशी मोठी धावसंख्या उभारली. या दुकलीला सलामीवीर फिल हयुज (47) आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलची (31) चांगली साथ लाभली. फिंचने फॉर्म राखताना दौ-यातील सलग दुसरे अर्धशतक ठोकले. हयुजसह त्याने दिलेली झटपट शतकी सलामी (110) पाहता पाहुणे मोठी धावसंख्या रचणार, हे नक्की होते आणि तसेच घडले.

फिंच आणि हयुजने भारताच्या अस्थिर मध्यमगती मा-याचा समाचार घेत सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. 10व्या षटकात त्यांनी संघाचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अधिक आक्रमक होत 18व्या षटकात शतक फलकावर लावले. यात फिंचचा मोठा वाटा राहिला. त्याने 54 चेंडूंत 8 चौकार आणि दोन षटकारांसह वनडेतील पहिले अर्धशतक ठोकले.

हयुजला रैनाकरवी झेलबाद करण्यात रवींद्र जडेजाला अपयश आले. शेन वॉटसन (2) आणि अ‍ॅडॅम वोग्जला (7) अनुक्रमे झेलचीत आणि धावचीत करत डावखुरा युवराज सिंगने प्रतिस्पध्र्याना आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र जॉर्ज बेलीने एक बाजू लावून धरली. बेलीने 54 चेंडूंत 5 चौकारांसह शानदार अर्धशतकी खेळी करताना 37व्या शतकात ऑस्ट्रेलियाचे द्विशतक पूर्ण केले. शतकाकडे कूच करणा-या बेलीला अश्विनने बाद केले. प्रतिस्पर्धी कर्णधाराने 82 चेंडूंत 10 चौकारांसह 85 धावांची खेळी केली.

बेलीनंतर ग्लेन मॅक्सवेल (23 चेंडूंत 31 धावा) आणि जेम्स फॉकनरने (22 चेंडूंत 27 धावा) फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला तीनशेपार नेले. मध्यमगती गोलंदाजीबाबतची भारताची समस्या प्रामुख्याने जाणवली. कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने तब्बल 7 गोलंदाज वापरले. मात्र भुवनेश्वर कुमार आणि युवराजचा कोटाफ त्याने का पूर्ण केला नाही, हे उमगले नाही.