व्हेटेलला जापनीज ग्राँप्रीचे जेतेपद

सुझुका- रेड बुलचा जगज्जेता जर्मन ड्रायव्हर सेबॅस्टियन व्हेटेलने रविवारी जापनीज ग्रॉँप्री फॉर्म्युला वनचे जेतेपद पटकवले. मात्र या रेसमध्ये फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोने चौथे स्थान मिळवल्याने जेतेपदासह सलग चौथ्यांदा जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात त्याला अपयश आले.

व्हेटेलने 100 गुणांसह अव्वल स्थान राखले आहे. अलोन्सो (90 गुण) दुसर्‍या स्थानी आहे. अद्याप वर्षातील चार ग्राँप्री शिल्लक असल्याने व्हेटेलला जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याची संधी आहे. नोएडात 27 ऑक्टोबरला होणार्‍या इंडियन ग्रॉँप्रीद्वारे जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

विशेष म्हणजे हंगामातील सलग पाचवी आणि वर्षातील नववी रेस जिंकत व्हेटेलने दमदार फॉर्म कायम राखला. दुसर्‍या स्थानावरून रेसला सुरुवात करूनही त्याने बाजी मारली. पहिल्या स्थानावरून रेस सुरू करणारा व्हेटेलचाच संघसहकारी मार्क वेबरला मात्र दुस-या स्थानी समाधान मानावे लागले. चौथ्या ग्रिडवरून रेस सुरू करणारा लोटस-रेनॉल्टचा रोमेन ग्रॉशिनला तिस-या स्थानासह पोडियममचा मान मिळाला.

सात फे-यांनंतर गाडीचा टायर पंक्चर झाल्याने मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनला माघार घ्यावी लागली. त्याने तिस-या स्थानावरून रेसला सुरुवात केली होती. फोर्स इंडियाचे पॉल डी रेस्टा आणि अ‍ॅड्रियन सुटीलने निराशा केली. त्यांना अनुक्रमे 11व्या आणि 14व्या स्थानी समाधान मानावे लागले.