चित्तूर : चित्तूरमध्ये एका घरात लपून बसलेले अतिरेकी तिरूपतीच्या बालाजी मंदिरात स्फोट घडविण्यासाठी आले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही या अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे या पोलिस तपासात समोर आले आहे. या पार्श्वणभूमीवर तिरूपती मंदिराततील पोलिस बंदोबस्तायत वाढ करण्यात आली असून सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
चेन्नईमध्ये येत्या १८ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी यांचा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अरूण शौरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहे. या कार्यक्रमातच घातपात घडवून आणण्यासाठी हे अतिरेकी आले असावेत, असा संशय पोलिसांना आहे. आंध्रप्रदेशातील चित्तूरमध्ये एका घरात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना हूसकावून लावण्याच्या कारवाईमध्ये एक पोलिस अधिकारी शहीद आणि दोन कॉन्स्टेबल जखमी झाले होते. ५ ऑक्टोबर रोजी ही चकमक झाली होती. याच कारवाईत पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जेरबंद केले होते. तर एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. दहशतवादी घुसलेल्या घरातील एक महिला आणि २ लहान मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांनी जीवाची बाजी लावली.
या कारवाईत पकडलेल्या दहशतवाद्यांनीच पोलिसांना दिलेल्या जबानीत हे अतिरेकी बालाजी मंदिरात स्फोट घडविण्यासाठी आले असल्याची माहिती हाती आली आहे. तिरूपती बालाजी मंदिरात दरवर्षी नवरात्रात ब्रह्मोत्सव होत असतो. या ब्रह्मोत्सवात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या अतिरेक्यांचा डाव होता.
अतिरेक्यांबरोबर चकमक झालेल्या चित्तूरमधील ठिकाणापसून तिरूपती मंदिराजवळच असल्यामुळेच तातडीने तिरूपती मंदिरातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती. अतिरेक्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त तिरूपती मंदिरच नाही तर नरेंद्र मोदींसह देशातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते या अतिरेक्यांच्या हिटलिस्टदवर होते.