तेलंगणा विरोधात आता चंद्राबाबू नायडूचे उपोषण

नवी दिल्ली- स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरुन आता वातावरण चांगलंच तापले आहे. तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी स्वतंत्र तेलंगणा विरोधात सोमवारपासून नवी दिल्लीत उपोषणाला सुरूवात केली. तर दुसरीकडे वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस आहे. जगनमोहन यांनी शनिवारपासून उपोषणाला सुरुवात केली.

चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची घोषणा केली. आंध्र प्रदेशातल्या संकटाला सोनिया गांधी कारणीभूत असल्याचा आरोप जगनमोहन यांनी केला आहे. शिवाय राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी स्वतंत्र तेलंगणाचा घाट घालून सरकार आंध्रातल्या जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरुन घटक पक्षांनी युपीए सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा निर्णय घेण्याआधी सरकारनं सीमांध्रातल्या जनतेला विश्वासात घेणं गरजेचं होते, असा घरचा आहेर राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांनी युपीए सरकारला दिला आहे. तेलंगणाच्या मुद्यावर काँग्रेसची भूमिका पाहता जगनमोहन यांच्या आरोपात तथ्य असल्याचे भाजप नेते कीर्ती आझाद यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सीमांध्रातल्या जनतेचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळते. विजयनगरम येथे ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले असून जमावाला आटोक्यात ठेवण्यासाठी विजयनगरममध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

Leave a Comment