निवडणूक खर्चात भाजपा आघाडीवर

नवी दिल्ली – २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ४४८.६६ कोटी रुपये तर कॉंग्रेस पक्षाने ३८०.०४ कोटी रुपये खर्च केला असून या खर्चाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी कॉंग्रेसवर आघाडी मिळवली आहे. निदान निवडणूक आयुक्तांना सादर केलेल्या खर्चाच्या आढाव्यात तरी असे चित्र दिसून आले आहे. या आढाव्याच्या प्रती काही पत्रकारांना मिळाल्या असून त्यांनी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

खर्च केलेल्या रकमा कोणाकडून आणि कशा मिळाल्या याचाही तपशील निवडणूक आयोगाला द्यावा लागलेला आहे. भाजपा आणि कॉंग्रेससह सर्व पक्षांनी तोही सादर केला आहे. भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या रकमांमध्ये चेकद्वारे मिळालेल्या रकमा मोठ्या प्रमाणावर आहेत तर कॉंग्रेसला मिळालेल्या देणग्यांमध्ये नगदी रकमांचा जास्त भरणा आहे. अन्य पक्षांमध्ये बहुजन समाज पार्टीने या निवडणुकीत केलेल्या खर्चाचे तपशील जाहीर केले आहेत, पण ते भाजपा आणि कॉंग्रेसच्या मानाने फारच कमी आहेत. बसपाने २१.२३ कोटी रुपये खर्च केल्याचा आढावा सादर केला आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने २६.१७ कोटी रुपये खर्च केले आहेत.

डाव्या आघाडीपैकी माकपाने १०.२६ कोटी रुपये खर्च केले आहेत तर मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीने २१.४९ कोटी रुपये खर्च केल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आढाव्यात म्हटले आहे. द्रमुक, अण्णा द्रमुक यांनीही १० ते २० कोटी रुपयांच्या दरम्यान रकमा खर्च केलेल्या आहेत.