भाजपचे पुन्हा बंडखोरांना साकडे

मुंबई- मुंबईतील महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आलेल्या भाजपच्या पदाधिका-यांसाठी पुन्हा पक्षाचे दरवाजे खुले करून त्यांना परतण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे. यापूर्वी पक्षातून बाहेर पडलेल्या तसेच कारवाई झालेल्या पदाधिका-यांना तसेच नगरसेवकांना पुन्हा स्वगृही येण्याचे आवाहनही भाजपने केले.

गेल्या निवडणूकीत माजी नगरसेवक पराग अळवणी यांची पत्नी ज्योती अळवणी, जयश्री खरात आणि बाबू शिंगारे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबत कारवाई करण्यात आलेल्या अन्य कार्यकर्त्यांनाही भाजपमध्ये घेण्यात येणार असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष अड. आशिष शेलार यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजा चौगुले भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता असून चौगुले यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. चेंबूर येथील भाजपच्या एका कार्यक्रमात चौगुले हे मुंडेंसोबत सहभागी झाले होते. त्यांनी ईशान्य मुंबईतील एका विधानसभा क्षेत्राचा आग्रह मुंडेंकडे धरल्याची माहिती सुत्रांनी दिली.