किंग कॅन डू नो रॉंग

इंग्रजीत अशी म्हण आहे की,किंग कॅन डू नो रॉंग. याचा अर्थ आहे, राजा जे काही करील ते बरोबरच असणार. राजा कधी चूक करू शकत नाही. त्याने काही चुकीचे केले तरीही प्रजेने त्याला बरोबरच म्हटले पाहिजे. कॉंग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांच्यावर आता असेच म्हणण्याची वेळ आली आहे कारण आधी आपणच जे बरोबर म्हटले होते ते आता राहुल गांधी यांनी केवळ चुकीचेच नाही तर नॉनसेन्स ठरवले आहे. राहुल गांधी हे त्यांच्यासाठी किंगच आहेत. तेव्हा त्यांनी चुकीचे काहीही म्हटले तरीही त्यांना आता बरोबरच म्हटले पाहिजे. एवढेच नाही तर त्यांनी आता जे काही म्हटले आहे ते फार मोठे सत्य आहे असे म्हणून राहुल गांधी यांनीहे सत्य सांगून देशाची मोठी सोय केली असल्याचे म्हणावे लागेल. किंबहुना अजय माकन तसेच म्हणत आहेत. झाली गोष्ट अशी की, लोक प्रतिनिधींना कनिष्ठ न्यायालयात एकदा दोषी ठरवले गेले की त्यांचे सदस्यत्व रद्द झाले पाहिजे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तोच निर्णय अंमलात आला असता तर अनेक आमदार खासदारांना आपले सदस्यत्व गमवावे लागले असते. म्हणून संपुआघाडी सरकारने अशा गुन्हेगार आमदार खासदारांना दिलासा दिला आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अंमलात येणार नाही असा अध्यादेश काढला. जो लोकांच्या नाराजीस कारणीभूत ठरला.

हा अध्यादेश सरकारने काढला. म्हणजे तो मनमोहनसिंग यांनी काढला. पण ‘सिंग’ने काढलेला हा अध्यादेश ‘किंग’ला मान्य नाही. सिंगला जे मान्य आहे ते किंेगला मान्य नाही. पण आपल्याला हे मान्य नाही असे या किंगला उशिरा कळले. सरकारने अध्यादेश काढला तेव्हा राहुल दी ग्रेट काहीच बोलले नाहीत. त्यांना हा आदेश मान्य आहे असाच सर्वांचा समज झाला. आजवर सरकारने काढलेल्या आदेशाला राहुल गांधी यांनी कधीच विरोध केलेला नाही. त्यामुळे प्रवक्ते म्हणून अजय माकन यांनी अध्यादेशाची तरफदारी केली. दरम्यान काय गंमत झाली ? पक्षातल्या दिग्विजयसिंेग, संदिप दीक्षित आणि मिलिंद देवरिया यांनी या अध्यादेशाला आपला विरोध असल्याचे जाहीर केले. आता पक्षात असा विरोधी आवाज निघतोय म्हटल्यावर तो प्रवक्त्याने दाबला पाहिजे. माकन यांनी या तीन नेत्यांना फटकारले. सरकारने काढलेला अध्यादेश बरोबरच आहे. त्याला असा विरोध करणे योग्य नाही असे माकन यांनी या तिघांना बजावले. सरकारला काय वेड लागलेय का ? सरकारने आदेश काढलाय म्हणजे तो मनमोहनसिंग, पी. चिदंबरम आणि सोनिया गांधी यांनी काढलेला आदेेश आहे. तो योग्यच असणार,असे माकन यांनी या तिघांना खडसावले.

माकन यांचे म्हणणे असे होते की,सिंग कॅन डू नो रॉंग. भाजपानेही या अध्यादेशाला विरोध केला. मग तर काय ? माकन यांनी भाजपालाही आडे हाथों लिया. सरकार म्हणजे काय चेष्टा आहे का? काही कळतय की नाही भाजपाच्या नेत्यांना ? माकन यांचे म्हणणे खरेच होते. सरकार म्हणजे काही चेष्टा नाही पण माकन यांचीच चेष्टा झाली. दिग्विजयसिंग, देवरा आणि संदिप दीक्षित यांनी आणि विशेष म्हणजे भाजपाने जी लाईन घेतली तीच राहूल गांधींनी घेतली. म्हणजे कॉंग्रेसच्या उपाध्यक्षांनी आपल्याच पक्षाच्या सरकारने घेतलेली लाईन चुकीची असल्याचे म्हटले. आता यापेक्षा मोठी बातमी ती काय असेल ? सरकारची ही भूमिका चुकीची आहे, तिचा फेरविचार करावा लागेल, हा अध्यादेश सौम्य करावा लागेल किंवा अधिक कठोर करावा लागेल असे राहुल गांधंी शहाण्यासारखे काही म्हणाले असते तर त ठीक होते. पण आपण नैतिकतेचे मोठे पुरस्कर्ते आहोत असे दाखवण्याची लहर त्यांना आली होती की काय हे माहीत नाही पण त्यांनी आपल्याच पक्षाला या अध्यादेशा बद्दल जोरदारपणे लाथाडले. हा अध्यादेश फेकून द्या, तो फाडून फेका, तो नॉनसेन्स आहे असे जबरदस्त प्रहार त्यांनी केले. आता अजय माकन काय बोलणार ? दिग्विजयसिंग यांनी विरोध केला तेव्हा माकन यांनी त्यांना झापले होते मग आता राहुल गांधींना काय करणार ?

राहुल गांधी यांनी तर आपल्या सरकारची लाजच काढली. प्रवक्ते म्हणून अजय माकन यांना मान खाली घालावी लागली. राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या प्रवक्त्यांची कार्यशाळा घेतली होती. तिच्यात प्रवक्त्यांनी कसे बोलावे यावर मार्गदर्शन केले होते. पण एकाच काय पण पक्षाच्या अनेक राज्यातल्या प्रवक्त्यांना राहुल गांधी यांनीच अशा काही संभ्रमात टाकले की त्यांना आपल्या राजकुमारांचे समर्थन करताना नाकी नव यायला लागले. माकन यांना पत्रकारांनी विचारले, बोला आता राहुल गांधी यांना काय म्हणणार ? त्यांनी तर सरकारलाच आव्हान दिले आहे. आता राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार हा नॉनसेन्स अध्यादेश मागे घेणार का ? त्यावर माकन यांना काय बोलावे समजेना. त्यांनी मौन व्रत धारण केले. राहुल गांधी यांनी या अध्यादेशाला आव्हान देऊन समाजात आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. ते राजकारणातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात आहेत अशी त्यांची प्रतिमा झाली खरी पण त्यासाठी त्यांना आपल्याच पक्षाच्या सरकारला नॉनसेन्स ठरवावे लागले. आता मनमोहनसिंग परदेशात आहेत ते परत आल्यावर काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण राहुल गांधी यांनी त्याना नॉनसेन्स ठरवले आहे.