गुवाहटी- बारपेटा जिल्ह्यामध्ये ट्रक-बसच्या एका विचित्र अपघातामध्ये तेरा लहान मुलांसह एकूण अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग ३५ वर हा अपघात झाला. पश्चिम बंगालकडून आलेल्या ट्रकने दोन मीनी बसला गुरूवारी पहाटे जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
एका पाठोपाठ एक चाललेल्या दोन बस पैकी पहिल्या बसला पहाटे ४:३० वाजता समोरून आलेल्या ट्रकची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढे चाललेली बस मागच्या बसवर धडकली व हा अपघात झाला असल्याचे दोहलापारा, सोरभोग पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सांगितले. दोन्ही बस एकमेकींवर धडकून २८ जणांचा मृत्यू झाला व दहा गंभीर जखमी झाले आहेत.
या दोन्ही बसमधील प्रवासी आसामच्या ढुबरी जिल्ह्यातील खोलखोली या ठिकाणाहून कामरूप जिल्ह्यातील रंगिया या ठिकाणी विट भट्टीच्या कामावर चालले होते, असे पोलिसांनी सांगितले.जखमींना बोंगाईगाव येथील बारपेटा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, ट्रक चालक फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.