लालूप्रसाद यादवांना पाच वर्षांची शिक्षा; 25 लाखांचा दंड

रांची – बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे तसेच 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

त्याच्यासह बिहारचे माजी मुख्यमंत्री जग्गनाथ मिश्रा यांना चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामळे लालूप्रसाद यादव यांची खासदारकी रद्द होणार आहे. दोषी लोकप्रतिनिधींबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार लालूप्रसाद यांची खासदारकी त्वरित रद्द होणार असून येत्या सहा वर्षात त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. केंद्र सरकारने कालच(बुधवारी) दोषी लोकप्रतिनिधींचे संसद सदस्यत्व वाचवणारा वटहुकूम मागे घेतला आहे

चारा घोटाळ्यात दोषी असलेल्या खासदार जगदीश शर्मा यांना चार वर्षांची शिक्षा व पाच लाख रुपयांचा दंड, के एम. प्रसाद यांना 5 वर्षांची शिक्षा व दीड लाख रुपयांचा दंड, बीएन शर्मा यांना 5 वर्षांची शिक्षा व दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लालूप्रसाद यादव यांचे वकील सुरेंद्र सिंह यांनी लालूंची तब्येत आणि वयाचा विचार करता त्यांना होणार्‍या शिक्षेत सूट मिळावी, यासाठी अपील केले होते. तसेच लालूप्रसाद हे रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांनी रेल्वेला चांगले दिवस आणून दिले होते. असे सांगितले. परंतु, सीबीआयच्या वकीलांनी भ्रष्टाचार करणार्‍यांना अधिकाधिक शिक्षा व्हावी अशी मागणी करत भ्रष्टाचार करणार्‍यांना यातून संदेश जाईल, असे सांगितले.

आज ज्या दोषींना शिक्षा सुनावली त्यामध्ये तीन आयएएस अधिकारी, एक आयआरएस अधिकारी, पशुपालन विभागाचे आठ अधिकारी, एक कोषागार पदाधिकारी आणि 20 पुरवठा कर्मचारी यांचा समावेश आहे. हे सर्वजण चाईबासा ट्रेजरी मधून 37.70 कोटी रुपयांचा घोटाळा करणारे दोषी आहेत. 5 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत दसर्‍याची सुट्टी असल्यामुळे लालूंच्या वकिलांकडे झारखंड उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 4 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. जरी अपील दाखल केले तरी दसर्‍याच्या सुट्टीपूर्वी त्यावर सुनावणी होणे शक्य नाही.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 30 सप्टेंबरला या सर्व 45 आरोपींना दोषी ठरवले होते विशेष न्यायाधीश प्रवासकुमार सिंह यांनी यातील 8 दोषींना त्याच दिवशी तीन-तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आणि 50 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यतचा दंड ठोठावला. या आठ लोकांमध्ये दोन राजकीय पक्षांचे नेते आहेत. त्यामध्ये धु्रव भगत आणि विहारचे माजी मंत्री विद्यासागर निषाद, एक आयएएस अधिाकरी आणि पाच पुरवठा कर्मचार्‍यांचा समावेश होता.

Leave a Comment