नवी दिल्ली – कर्णधार रोहित शर्माने २४ चेंडूंत ५१ धावांची ‘स्फोटक’ खेळीमुळे चॅम्पीतयन लीग स्प र्धेत ‘मुंबई इंडियन्स’ने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांची गाठ चेन्नई सुपर किंगशी पडणार आहे. ‘पर्थ स्क्रॉर्चर्स’वर ६ गडी व ४० चेंडू बाकी ठेवून विजय मिळविला अन् अगदी झोकात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या ‘पर्थ स्कॉर्चर्स’ने निर्धारित २० षटकांत १४९ धावा केल्या. सेमीफयानलमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला हे ‘लक्ष्य’ १४.२ षटकांत गाठायचे होते. रोहित शर्माने कर्णधाराला साजेसा खेळ करून आपल्या संघाला हे लक्ष्य १३.२ षटकांतच गाठून दिले अन् उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले. ‘पर्थ स्क्रॉर्चर्स’चे १४९ धावांचे ‘लक्ष्य’ घेऊन उतरलेल्या ‘मुंबई इंडियन्स’ने आपला मोहरा सचिन तेंडुलकर शून्यावर गमावला.
त्यांनतर ड्वेन स्मिथने सलामीला येत ५ चौकार व ३ षटकांरासह ४८ धावांची खेळी साकारली. सचिन बाद झाल्यावर रोहितने मॅक्सवेलला बढती दिली, परंतु तो ७ चेंडूंत १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्माने ३ चौकार व ४ षटकार लगावत २४ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या. त्याला कायरॉन पोलार्डने तेवढीच तोलामोलाची साथ देत १८ चेंडूंत २३ धावा केल्या. हॉगच्या फिरकीवर पोलार्ड बाद झाल्यावर अंबाती रायुडूने ४ चेंडूंत नाबाद १४ धावा करीत रोहितसह विजयाला गवसणी घातली.
तत्पूर्वी व्हाइटमन (नाबाद ५१), ऍगर (३५), कार्टरराइट (२८) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ‘पर्थ स्क्रॉर्चर्स’ने निर्धारित २० षटकांत १४९ धावा केल्या होत्या. ‘अ’ गटातून ‘मुंबई इंडियन्स’ व ‘राजस्थान रॉयल्स’ या संघांनी तर ‘ब’ गटातून चेन्नई सुपरकिंग्जने उपांत्य फेरी गाठली आहे.