मुंबई- राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आर.के.सहाय यांचे गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. सहाय यांनी १५ सप्टेंबर रोजी मलबार हिल येथील शासकीय अधिका-याच्या निवासस्थानात स्वतःला जाळून घेतले होते. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अखेरपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.
गेल्या १८ वर्षांपासून पोलिस खात्यात कार्यरत असणारे आर.के.सहाय यांची बहुतांश सेवा साइड ब्रँचला झाली होती. यशदा, वायरलेस विभाग, गृह विभाग, एसटी महामंडळ अशा विविध ठिकाणी काम केल्यानंतर नुकतेच ते पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळात महाव्यवस्थापक म्हणून रुजू झाले होते. एसटी महामंडळातील एक गैरव्यवहार त्यांच्या कारकिर्दीत उघड झाला होता. हे प्रकरण दडपण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे होते.
सहाय साईड ब्रँचमधील पोस्टींगला ते कंटाळले होते. तशी खंतही त्यांनी एकदा बोलून दाखवल्याचे माजी आयपीएस अधिकारी राजू खिलनानी यांनी सांगितले आहे. तर सहाय यांचे गेल्या काही वर्षांपासून पत्नीसोबतही खटके उडत होते. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पुणे पोलिसांकडे अडीच वर्षांपूर्वी लेखी तक्रारही दिली होती.
१५ सप्टेंबर रोजी मलबार हिल येथील शासकीय अधिकार्यांणचे निवासस्थान असलेल्या अवंती अंबर अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सहाय यांनी स्वतःला जाळून घेतले होते. यात ते ६० टक्के भाजल्याने त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. आत्महत्या कौटुंबिक वादातून केली की कामाच्या ताणामुळे हे सहाय यांनी दिलेल्या जबाबावरून स्पष्ट होणार होते.