प्रा. शेट्टी-सावंत गटात लढत रंगणार

मुंबई – न्यायालयाकडून निवडणूक लढवण्याबाबत दिलासा मिळताच प्रा. रत्नाकर शेट्टी मुंबई क्रिकेट संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत उभे राहणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर ते विद्यमान अध्यक्ष रवी सावंत यांच्याच विरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सावंत कोणत्याही पदासाठी उभे राहिले तरी त्यांना शेट्टींचा सामना करावाच लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
गेले काही महिने प्रा. रत्नाकर शेट्टी एमसीएविरुद्ध न्यायालयात लढत आहेत आणि त्यांना न्यायालयाकडून दिलासाही मिळाला आहे.

एमसीएने शेट्टींवर बंदी लादली होती. या बंदीविरोधात ते न्यायालयात गेले आहेत. हे प्रकरण अद्याप न्यायालयात असून शनिवारी त्याचा निर्णय लावला जाणार आहे आणि हा निर्णयही त्यांच्याच बाजूने लागण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. प्रा.शेट्टींनी एमसीएविरुद्ध चार हात करण्यासाठी आपला पॅनलही जवळजवळ तयार केला आहे. त्यांचे पदाधिकारीही निश्चिंत झाले आहेत. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती न्यायालयाच्या निकालाची. एकीकडे निकाल लागला तर दुसरीकडे प्रा. शेट्टी आपले पॅनल जाहीर करतील.

प्रा. शेट्टी यांना गेले काही महिने एमसीएकडून प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्या मनस्तापाचा सव्याज बदला घेण्यासाठी प्रथमच शेट्टी यांचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रा. शेट्टी हे सावंत यांच्याविरुद्धच दंड थोपटणार आहेत. मग ते कोणत्याही पदासाठी उभे राहोत. शरद पवार अध्यक्षपदासाठी उभे राहणार असल्यामुळे शेट्टी-सावंत यांची गाठ उपाध्यक्ष, संयुक्त सचिव किंवा खजिनदार यापैकी कोणत्याही एका पदासाठी पडेल.

प्रा. शेट्टी यांचे पॅनल अन्य दोन पॅनलप्रमाणे तगडे आहे. यात दोन माजी कसोटीपटूंप्रमाणे विद्यमान एमसीए कार्यकारिणी सदस्यही आपले नशीब अजमावणार आहेत. या तगड्या पॅनलमधून किमान तीन-चार जणांची निवडून येण्याची क्षमता असल्याचे बोलले जात आहे. न्यायालयाचा निकाल न आल्यामुळे पॅनलमधील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.