दोषी लोकप्रतिनिधींवरील वटहुकूम मागे

नवी दिल्ली – काँग्रेस उपध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोध केल्यानंतर अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने दोषी लोकप्रतिनिधींवरील वटहुकूम बुधवारी मागे घेतला. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, हा वटहुकूम मागे घेण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरएलडीचे नेते अजित सिंग यांनी विरोध केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याआधी काँग्रेसच्या कोअर ग्रुपने दोषी लोकप्रतिनिधींना वाचविणारा वटहुकूम मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सात रेसकोर्स निवासस्थानी झालेल्या काँग्रेस कोअर ग्रुपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर काँग्रेस कोअर ग्रुपची बैठक झाली. तत्पूर्वी बुधवारीस सकाळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपला वटहुकूमाला का विरोध आहे ? काय आक्षेप आहेत ते सांगितले. दोषी लोकप्रतिनिधींना वाचविणा-या वटहुकूमाच्या या मुद्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

कॅबिनेटने मंजूरी दिलेल्या या विधेयकाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता. राहुल गांधी आणि पंतप्रधानांमध्ये जवळपास 25 मिनिटे महत्वपूर्ण चर्चा झाली. राहुल गांधी यांनी यापूर्वीही पंतप्रधानांना पत्र लिहून या वटहुकूमाबद्दल आपली नाराजी प्रगट केली होती. गेल्या आठवडयात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हा वटहुकूम फाडून कच-यात फेका असे स्पष्ट मत व्यक्त केले होते.

काँग्रेस पक्षाने या वटहुकूमाला विरोध केल्याने केंद्र सरकार हा वटहुकूम मागे घेण्याची शक्यता होती आणि तसेच घडले. सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा होणा-या लोकप्रतिनिधीचे संसद सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र केंद्र सरकारने दोषी लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व वाचवण्यासाठी वटहुकूम काढला होता.