न्यूयॉर्क – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना ‘देहाती औरत’ म्हटल्याच्या कथित वादामुळे नवाज शरीफ हे विलक्षण नाराज झाल्याचे वृत्त आहे. विशेषत: हे प्रकरण नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या त्यांच्या सभेत उपस्थित केले आणि शरीफ यांनी मनमोहनसिंग यांचा अवमान केला आहे, असा आरोप केला. त्यामुळे तर नवाज शरीफ यांना या प्रकरणाची दखल घेण्याची गरज पडली.
‘देहाती औरत’ प्रकरणावरून शरीफ नाराज
आपले हे उद्गार एवढ्या वादास कारणीभूत ठरतील असे त्यांना वाटले नव्हते. म्हणून त्यांनी नंतर सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. आपल्या म्हणण्याचा हेतू वेगळा होता आणि देहाती औरत या शब्दाला संदर्भही वेगळा होता, असा खुलासा त्यांनी केला. नवाज शरीफ यांनी हे प्रकरण वाढत चालले आहे हे लक्षात येताच आपल्या अधिकार्यांना बोलावून आपल्या म्हणण्याचा विपर्यास होत असल्याचे भारतीय अधिकार्यांच्या लक्षात आणून द्यावे, असे सांगितले.
मनमोहनसिंग यांच्यासाठी असे काही शब्द वापरलेले नाहीत, अशी मखलाशी त्यांनी केली आणि त्यांची ही मखलाशी त्यांचे परराष्ट्र सचिव जलील अब्बास जिलानी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्या कानावर घातले. एकंदरीत हे प्रकरण बरेच वाढले आणि त्यामुळे स्वत: नवाज शरीफच अस्वस्थ झाले. अर्थात तसे असले तरी मनमोहनसिंग यांनी आपल्या वागण्यात किंवा बोलण्यात कसलीही कटुता येऊ दिली नाही.
