मुंबई – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतली जाहीर सभा बरीच वादळी ठरली आणि या सभेनंतर त्यांनी आता मुंबईकडे लक्ष वळवले असल्याचे सांगण्यात येत आहे. नरेंद्र मोदी मुंबईत येणार असले तरी त्यांची मुंबईत जाहीर सभा आयोजित केलेली नाही. परंतु त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुंबई भेट असल्यामुळे तिच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रावर लक्ष
श्री. नरेंद्र मोदी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उघडण्यात आलेल्या मुंबई डायमंडस् मर्चंटस् असोसिएशनच्या डायमंड हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. या कार्यक्रमा व्यतिरिक्त व्यापारी आणि उद्योजकांच्या काही छोट्या छोट्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीला मुंबई आणि महाराष्ट्रात काही राजकीय लाभ होईल अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीचा आपला असा एक मताधार महाराष्ट्रात आहे, परंतु तो सध्या विचलित झालेला आहे आणि तो मोदींमुळे पुन्हा पक्षाकडे सरकेल अशी आशा भाजपा नेत्यांना वाटत आहे. नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्राकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. कारण महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. देशात लोकसभेच्या जागांच्या बाबतीत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो याला महत्व दिले जात आहे.
