बेंगळुरू : कर्नाटकात यावर्षी आतापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे ११९ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ , ७२४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी दिली. कर्नाटकमधील पावसाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कर्नाटक दौ-यावर आले होते. या पथकाला सिद्धरामय्या यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानाविषयीची माहिती सादर केली.
कर्नाटकात आतापर्यंत पावसाचे ११९ बळी
कर्नाटक राज्यात यावर्षी १ जून ते १८ सप्टेंबरदरम्यान ८८८ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. कर्नाटकमधील सरासरी पावसाच्या तुलनेत यंदा १७ टक्के अधिक पाऊस झाला. कर्नाटकमधील आठ जिल्ह्यांत सरासरीच्या ४० टक्क्यांहून अधिक , चार जिल्ह्यांत ३० टक्क्यांहून अधिक, तर पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक पाऊस झाला आहे.
यावर्षी पावसामुळे ११ हजार ५३६ घरांचे नुकसान झाले असून १ लाख ३३ हजार ५३६ हेक्टर शेतीस पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे फुलशेती व फळबागांचेही अंदाजे ३२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रस्ते, पूल, पाटबंधारे प्रकल्प, पाणीपुरवठा योजना व विद्युतवाहिन्या यांचेही पावसामुळे नुकसान झाल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
