नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये डेंग्यूची साथ वाढली आहे. त्यासोबतच यावरून सर्वच पक्षाकडून राजकारण सुरु झाले आहे. कारण दिल्लीत डेंग्यूच्या वाढत्या उपद्रवाला नरेंद्र मोदींच्या रॅली जबाबदार असल्याचे मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्त्व्यावरून आता या प्रश्नावरून सर्वांकडून आरोप- प्रत्याचरोप केले जाणार असल्याने आता वातावरण तापणार आहे.
दिल्लीतील नगर निगम मोदींच्या २९ तारखेला होणा-या रॅलीत व्यस्त असल्याने कर्मचा-यांना डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ मिळत नाही. तसेच गेल्या तीन वर्षांच्या आकड्यावर लक्ष टाकले तर या वर्षात डेंग्यूचा उपद्रव जास्त झाला आहे, असेही दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित म्हणाल्या.
कर्मचारी डेंग्यूवर लक्ष देण्याऐवजी मोदींच्या होणा-या रॅलीच्या तयारीत व्यास्त आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराला मोदीच जबाबदार आहे म्हणत शिला दीक्षित यांनी खापर त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या रॅलीसाठी महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सदनातील नेते रोहिणी क्षेत्रातील जपानी पार्कमध्ये कार्यरत आहे, असे नगर निगमधील विरोधी पक्षनेते मुकेश गोयल यांनी सांगितले. डेंग्यूची सर्वात जास्त ९९ रुग्ण रोहणी क्षेत्रात आढळले आहेत. दिल्लीत ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १४२ होती तर ती सप्टेंबरमध्ये वाढून १५६७ इतकी झाली आहे.