मुंबई- डोंबिवली येथे ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मत्यू समयी ते ८६ वर्षाचे होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीतील लाईफलाईन या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणीच उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंबिवलीत आणि माध्यमिक शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज शाळेत झाले. ते १९४५ साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. तर १९४९ साली बी. एस्सी.ची पदवी मिळविली. त्यांचे विविध वृत्तपत्रात आणि साप्ताहिकातून लेखन प्रसिद्ध झाले.लेखक, नाटककार, कथाकार, कादंबरीकार आणि ललित लेखक म्हणून शंकर नारायण नवरे हे नाव ‘शन्ना’ म्हणूनच सर्व महाराष्ट्राला परिचित होते.
‘एक असतो राजा’, ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’ ‘गुलाम’, ‘हवा अंधारा कवडसा’,’वर्षाव’, ‘रंगसावल्या’, ‘ग्रॅन्ट रिडक्शन सेल’, ‘हसत हसत फसवुनी’ ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. तसेच ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह आणि ‘निवडुंग’, ‘इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’ या कादंब-या प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘कवडसे’, ‘शन्नाडे’, ‘उनसावली’, ‘झोका’ हे त्यांचे अतिशय गाजलेले ललित लेखसंग्रह आहेत. शं. ना. नवरे यांच्या निधनाने मराठी साहित्य वर्तुळात तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.