केनियात दहशतीचा थरार सुरुच

नैरोबी – नैरोबीतील वेस्टगेट मॉलमध्ये केनियन सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये सलग चौथ्या दिवशी मंगळवारीही चकमक सुरु आहे. केनियन सरकारने संपूर्ण मॉलवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केल्यानंतर काही वेळातच पुन्हा येथे गोळीबार सुरु झाला.

अजूनही काही नागरिक दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. चकमक अंतिम टप्प्यात असल्याने केनियन सरकारने सांगितले आहे. या हल्ल्यात 69 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात आठ भारतीयांचा समावेश आहे. यातील सातजण गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रमधील आहेत. केनियन सरकारने मॉलवर ताबा मिळवल्याचा दावा केल्यानंतर, सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉलमधुन गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले.

मॉलमधुन मृतदेह बाहेर काढण्यात काम सुरु आहे. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या बहुतांश नागरिकांची सुटका करण्यात आली आहे तरीही, अजून दहा नागरिकांना दहशतवाद्यांनी बंधक बनवून ठेवले असण्याची शक्यता आहे. केनियन सुरक्षा पथके या मॉलचा कोपरा न कोपरा तपासत आहेत. मॉलवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांमध्ये दोन ते तीन अमेरिकन आणि एक ब्रिटीश महिला असल्याचे केनियाचे परराष्ट्र मंत्री अमिना मोहोम्मद यांनी सांगितले.

मूळचे सोमालियन किंवा अरेबियन वंशाचे असणारे हे अमेरिकन दहशतवादी 18 ते 19 वर्षांचे आहेत. ते अमेरिकेत मिनीसोटा येथे रहात होते. हल्लेखोरांमधील महिला दहशतवादी ब्रिटनची नागरिक आहे. सोमालियतील अलकायदाशी संबंधित असणार्‍या अल शबाब या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला आहे. केनियाने सोमालियामध्ये इस्लामी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचे अल शबाबने म्हटले आहे.