वर्षभर शूटिंगच्या निमित्ताने माझा जगभर प्रवास सुरू असतो. त्यामुळे कुटुंबीयांसह नातेवाईकांना एकत्र भेटता येत नाही, मात्र दिवाळीमध्ये मी सर्वांसाठी आवर्जून वेळ काढते. दिवाळीनिमित्त सर्व कुटुंबीयांसह नातेवाईकांना एकत्र भेटता येते. या सणादिवशी सर्व नातेवाईकांचे घरी येणे-जाणे होते. त्यांच्या सुख दु:खात सहभागी होता येते. या वेळी आपल्या माणसांना भेटताना होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नसल्याच्या भावना प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने व्यक्त केल्या.
दिवाळीबाबत बोलताना सई म्हणते की, माझा सर्वात आवडता सण दिवाळी आहे. थंडीचे दिवस, त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीच्या काळातील वातावरण, दिवाळीची रम्य पहाट हे सर्व वातावरण मन मोहून टाकणारे असते. दिवाळीला मी पहाटे लवकर उठते. या वेळी अभ्यंगस्नान, पहाटेचे वातावरण, फराळाचा दरवळ यामधील मजा इतर सणांवेळी येत नाही.
दिवाळीनिमित्त पै-पाहुण्यांची घरी रेलचेल असते. घरामध्ये सर्वजण पहाटे लवकर उठतात. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण असल्याने घराभोवती अंगणात सर्वत्र दिव्यांचा उजेड असतो. आकाशदिव्यांचा लखलखीत उजेड संपूर्ण अंगणभर पडलेला असतो. या वेळी घरातील चिमुकल्यांसह लहान-थोरांच्या अंगावरही नवीन कपड्यांचा सुवास दरवळत असतो. हे वातावरण अगदी मन प्रसन्न करून टाकणारे असते. फटाक्यांबाबत बोलताना सई म्हणाली, मी फटाके अजिबात उडवत नाही, मात्र दिवाळीतील फराळ आवडीने खाते. फराळामध्ये मला चकली सर्वात जास्त आवडते.
दिवाळीचा सर्व फराळ आम्ही घरीच बनवतो. कारण विकत आणलेल्या फराळाला घरची चव नसते. दिवाळीमधील चार-पाच दिवसांचे वातावरण आल्हाददायक, प्रसन्न असेच असते. दिवाळीचे दिवस कसे निघून जातात याचा पत्ताही लागत नाही. मग पुन्हा एकदा बिझी शेड्यूल. मग पुढील दिवाळी येईपर्यंत वाट पाहण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नाही.