चित्रपट निवडताना चोखंदळपणा दाखविणारी अभिनेत्री विद्या बालनने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. तिने केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांकडूनही नेहमीच पसंती मिळाली आहे.
आपल्या या लौकिकाला जागत विद्या आता काळा कोट आणि हॅट परिधान करून पडद्यावर हेरगिरी करताना दिसणार आहे. दिया मिर्झा आणि साहील संघा यांच्या बॉर्न फ्री एंटरटेन्मेंट या बॅनरखाली बनत असलेल्या बॉबी जासूस नामक चित्रपटात विद्या गुप्तहेराची प्रमुख भूमिका करणार आहे. प्रथमच अशी भूमिका करण्यास मिळत असल्याने विद्याही प्रचंड उत्साहित आहे. ही भूमिका नाही तर चित्रपटाच्या नावावरही ती खूश आहे.
दिया मिर्झा आणि साहील यांच्याशी विद्याची बर्याच दिवसांपासून मैत्री आहे. बॉबी जासूस आणि त्याच्या निर्मात्यांबाबत विद्या सांगते की, दिया व साहील असे निर्माते आहेत, ज्यांच्यासोबत काम करण्यास प्रत्येक कलाकार इच्छुक असतो. हा चित्रपट स्वीकारताना मी मात्र संयुक्ता चावलाची कथा व दिग्दर्शक समीर शेख याला पाहून घेतला. या दोघांचा आग्रह आणि वेगळी कथा यांमुळे मी या चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेसाठी विद्याची निवड करण्याचा विचार करण्यात आला, तेव्हा सगळ्य़ांनीच त्यावर एकमुखी शिक्कामोर्तब केले.
विद्या किती अभिनयकौशल्य करते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. याशिवाय ती एक बुद्धिमान, जिज्ञासू व विचार करणारी अभिनेत्री आहे. हे पात्र पेलण्यासाठी अशाच अभिनेत्रीची आवश्यकता असल्याचे दियाने सांगितले. साहीलनेही विद्याचा सहभाग हाच या चित्रपटाबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी पुरेसे असल्याचे सांगितले. बॉबी जासूसमध्ये ती कथा असून त्यातील पहिल्या कथेवर काम सुरू आहे. पुढच्या कथेवरही लवकर काम सुरू होईल, असेही त्याने स्पष्ट केले. नोव्हेंबरमध्ये चित्रणास सुरू होणारा हा चित्रपट उन्हाळ्य़ात प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी अपेक्षा आहे.