मुंबई- महालक्ष्मी परिसरातील शक्ती मिल येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी 60 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
तर शक्ती मिल येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना भांडूपमधील टेलिफोन ऑपरेटरवर झालेल्या बलात्कार प्रकरणात 27 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शक्ती मिल बलात्कार सुनावणी दोन महिन्यात होणार
या चारही आरोपींना सोमवारी प्रथम किल्ला न्यायालयात महानगर दंडाधिकारी उदय पदवाड यांच्यासमोर उभे करण्यात आले. यावेळी सरकारी वकील किरण बेंडवर यांनी या प्रकरणाचा तपास आणखी करायचा आहे. यातील आरोपींकडून दोन मोबाईल हस्तगत केले. मात्र त्यांनी चोरलेले 2500 रुपये आणि अन्य वस्तूंबाबत तपास होणे शिल्लक असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य करत आरोपींना 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर यातील तीन आरोपींना छायाचित्रकार महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले. यावेळी प्रधान सत्र न्यायाधीश शालिनी फनसलकर जोशी यांनी या प्रकरणाची सुनावणी 60 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे.
