जातीय हिंसाचार खपवून घेऊ नका!

नवी दिल्ली- राजकीय प्रभावाचा विचार न करता हिंसाचार पसरवू पाहणा-या असामाजिक प्रवृत्तींविरोधात राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावी, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यांना केले. राजकीय पक्षांनी जातीय संघर्षाचा फायदा घेणे टाळावे, असेही त्यांनी सांगितले. मुझफ्फरनगर जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय एकता परिषदेत पंतप्रधान बोलत होते.

राज्यांमधील किरकोळ घटनांचे पर्यवसान संघर्षात होऊ नये, याची सर्व राज्यांच्या प्रमुखांनी खबरदारी घ्यावी. तसेच अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, असे पंतप्रधानांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाने किरकोळ वादांवर त्वरित तोडगा काढावा आणि वाद परवणा-यांना अटक करावी असेही ते म्हणाले.
मुझफ्फरनगर येथे झालेल्या जातीय हिंसाचारात 50 जणांचा बळी गेला असून लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथे, बिहारमधील नावदा येथे, हैदराबाद आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराला देश पाहत आहे.

राष्ट्रविरोधी शक्ती देशाच्या वेगवेगळ्या समुदायांमध्ये कलह निर्माण करण्यास यशस्वी होतात. अशा प्रवृत्ती देशासमोर मोठे आव्हान निर्माण करत आहेत. हिंसाचाराच्यावेळी कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश राज्य सरकारांनी आपल्या प्रशासकीय अधिका-यांना द्यावा, असे पंतप्रधानांनी सांगितले. निवडणुकीमध्ये जातीय हिंसाचाराचा फायदा कोणत्या पक्षाला होईल यावर चर्चा करणे, दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. खरे तर जातीय हिंसाचाराचा फायदा कोणालाही मिळत नाही. भारतासारख्या देशामध्ये अशा गोष्टी होत असल्याने आपल्या सुसंस्कृतपणावर प्रश्नचिन्ह उभे राहते, असे त्यांनी सांगितले.