उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशींग या म्हणीवर सध्या महाराष्ट्रात छान चर्चा सुरू आहे. शरद पवार यांना काय झाले आहे हे काही कळत नाही. गेल्या महिन्यांत महाराष्ट्रात करण्यात आलेल्या एका मतदार सर्वेक्षणात पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यात लोकसभेच्या केवळ तीन जागा मिळतील असा निष्कर्ष निघाला आहे. गेल्या दोन निवडणुकांत या सर्वेक्षणात बरेच तथ्य असल्याचे दिसून आले आहे. काही संस्थांनी या शास्त्रात बरीच प्रगती केली आहे आणि अचूक अंदाज वतर्र्वण्यास सुरूवात केली आहे. अर्थात काही जणांचे अंदाज चुकतात पण अंदाजात तीन जागा म्हटले आहे आणि प्रत्यक्षात तीस जागा मिळाल्या एवढी तरी नक्कीच चूक होत नाही. एकंदरीत पवारांच्या हातातल्या आता आहेत त्या आठ जागा राहिल्या तरी ती अतिशयोक्ती वाटेल अशी स्थिती नक्कीच आहे. पवारांंनी पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणे आता बंद करावे असा हा सारा माहौल आहे. पवार तसे म्हणतही आहेत पण मनातून ते पंतप्रधान पदावर नजर ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर केन्द्रात अगदीच गांेंधळ झाला तर कदाचित अपघाताने ते पंतप्रधान होऊही शकतील एवढाच त्यांच्या स्वप्नाला आधार आहे.
नरेन्द्र मोदी हेही पंतप्रधानपदावर नजर ठेवून आहेत. पण त्यांनी ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा खोटेपणा केलेला नाही. त्यांच्या स्वप्नाला सत्याचा आधार आहे. आता सध्या भाजपाचे ११६ खासदार आहेत. ही संख्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किमान १४ पटीने जास्त आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिले तर त्यात अवास्तव काही नाही. किमान पक्षी ते पवारांपेक्षा अधिक वास्तव आहे. अशा स्थितीत पवारांनी मोदी यांना उद्देशून उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशींेग अशा शब्दात करणे यात मोदी यांच्यापेक्षा पवारांचेच हसे होणार आहे. कारण पवार हेच कशात काही नसताना पण मनातल्या मनात पंतप्रधानपदाची स्वप्ने पहात असतात. पवारांना हे सारे माहीत आहे पण त्यांना आता नेमके काय झाले आहे हे कळेनासे झाले आहे. कारण आपल्या ज्या म्हणण्याला तर्काचा आधार नाही अशी विधाने ते सातत्याने करायला लागले आहेत. गेल्या दोन तीन महिन्यातली त्यांची भाषणे ऐकली तर पवारांची आपल्या मनातली प्रतिमा बिघडून जायला लागली आहे.
पवारांचे मत असे आहे की, कशात काही नसताना मोदी पंतप्रधानपदाच्या तयारीला लागले आहेत. या वाक्याचा अर्थ काय ? लोकसभेच्या निवडणुका वेळेवर होणार नाहीत का ? अजून निवडणुकीची घोषणाही झाली नाही तर मोदींची उमेदवारी जाहीर करणे त्यांना अनुचित वाटते पण तशी तर कॉंग्रेसच्या नेत्यांनीही राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी परदेश प्रवासातून परतताना विमानात पत्रकारांना राहुला गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले. एवढेच नाही तर आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आनंदाने काम करू अशी तयारीही त्यांनी दाखवली. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनीही आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी हेच आहेत असे ठासून सांगितले. मग पवारांनी राहुल गांधी यांना उतावळा नवरा म्हटले नाही. तसे ते म्हणणार नाहीत आणि त्यांची टवाळीही करणार नाहीत. पण मोदींनाच त्यांनी हा आहेर केला आणि देवेन्द्र फडणवीस यांनी त्यांना चोख उत्तर दिले. पवारांचे नाव न घेता ते म्हणाले, काही जण बाशिंग बांधून बांधून थकले. पवारांना हे शेलापागोटे अगदी फिट्ट बसले. शरद पवारांनी गेल्या काही दिवसांत अशी अतार्किक विधाने केली आणि आपले हसे करून घेतले आहे. राजकारणात काय की व्यवहारात काय, अरेला कारे येणारच. तुम्ही लोकांची कुचेष्टा करणार असाल तर त्याला तसेच उत्तर येणार. ते सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल.
ते मध्यंतरी मुख्यमंत्र्यांवर घसरले आणि हाताला लकवा येतो अशी त्यांची गाजलेली टिप्पणी करून बसले. त्यावर त्यांचा फजितवडा झाला. त्यांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी काय काय म्हणून घेतले. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नाचंी कॉंग्रेसच्या नेत्यांनी हुर्यो उडवली. पवारांनी आपली अप्रतिष्ठा करणारी दुरुत्तरे आपल्या दिेशेने येतील असे शाब्दिक बाण लोकांना मारण्याचे टाळले पाहिजे. आपण आपल्या हाताने आपला आब ठेवून घेतला तरच लोक आपल्याला मान देतात. अन्यथा आपल्याला काय वाटेल ते ऐकून घेण्याची तयारी ठेवावी लागते. पवारांनी राजकारणात पन्नास वर्षे काढली आहेत. त्यांच्यात क्षमता आहे पण त्यांनी आता लोकांना शहाणपणाचे चार शब्द सांगितले पाहिजेत. त्यांच्या पातळीला येऊन सवाल जबाब करण्यात काही अर्थ नाही. ज्येष्ठ नेते ही आपली प्रतिमा आणि मोजकेच पण सकारात्मक बोलण्याची आपली शैल त्यांनी कायम ठेवली पाहिजे.