बेग विरोधात साक्ष देण्यासाठी एटीएसने धमकावले

मुंबई – पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या हिमायत बेगविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने साक्षीदारांना धमक्या देऊन साक्ष बदलली. त्यांना साक्ष देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिल्याचा गौप्यस्फोट ‘गुलैल डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे प्रमुख व शोध पत्रकार आशिष खेतान यांनी केला. याप्रकरणी दबाव आणण-या काही पोलिस अधिका-यांची नावे साक्षीदारांनी घेतली आहेत. खेतान यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकादेखील दाखल केली आहे.

स्टिंगऑपरेशनद्वारे मिळवलेली माहिती खेतान यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दाखवली.बेगवर गुन्हे सिद्ध होण्यासाठी सय्यद अब्दुल रहीम, रेहान शेख, मोहंमद अन्सारी, शेख नझीर अतीक व गौस शेख यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्यात. मात्र या सर्व साक्षी एटीएसच्या दबावाखाली येऊन न्यायालयात दिल्याचे सांगितल्याचे, तसेच अधिका-यांनी अनेकदा पुण्यातून आणून कशा प्रकारे साक्ष द्यायची याचे प्रशिक्षणही दिल्याचा दावा साक्षीदारांनी केला आहे.

या सीडीत पोलिस उपमहानिरीक्षक संजय लाटकर, सहाय्यक पोलिस आयुक्त विनोद सातव, सुधाकर रेड्डी, लोबो, मिलिंद गायकवाड या अधिका-यांची नावे साक्षीदारांनी घेतली आहेत. या सीडीतून एटीएसने साक्षीदारांना धमकावल्याचे दिसत असल्याने या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केल्याचे खेतान यांनी सांगितले. खेतान यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकादेखील दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.