पुणे, मोठ्या पावसानेच यावर्षीच्या मोसमी हंगामाला आरंभ झाला आणि महाराष्ट्रात सर्वत्र पावसानेच त्यकाची संागता होणार असे आता दिसू लागले आहे. महाराष्ट्रात प्रथमच मोसमी हंगामात गेल्या साठ वर्षातील टोकाचा कोरडा दुष्काळ व टोकाचा ओला दुष्काळ असे चित्र बघायला मिळाले. महाराष्ट्राच्या एका भागात अजूनही जनावरांच्या छावण्या सुुरु आहेत तर विदर्भात गेल्या पन्नास वर्षात पडला नाही असा ढगफुटीचा पाऊस पडून ओला दुष्काळ पडला आहे. शेते तर वाहून गेली आहेतच पण डांबरी रस्तेही वाहून गेले आहेत. महाराष्ट्रात यावर्षी मोसमी हंगामात सरासरीपेक्षा पंचवीस ते तीस टक्के पाऊस जादा पडूनही शेतकर्यांच्या आत्महत्येची समस्या सुटलेली नाही. दुर्दैवाने दररोज शेतकर्यांच्या बातम्या येण्यास आरंभ झाला आहे.
ऐतिहासिक सुका दुष्काळ व ऐतिहासिक ओला दुष्काळ
यावर्षी शेतीमालाच्या भावाची व त्यामुळे शेतकर्यांच्या कर्जफेडीची मोठी समस्या येणार आहे. कारण अन्नसुरक्षा विधेयकामुळे खुल्या बाजारातील शेतीमालाच्या भावाची संभाव्य समस्या हाच शेतकर्यांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. शेतीमालाला भाव मिळाला नाही तर शेतकर्यांच्या कर्जाचे हफ्ते थकतात त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावर्षीची स्थिती लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची आवश्यकता आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने खरीपाच्या काढण्या लांबल्या असल्या तरी हा पाऊस रब्बीला चांगला असेल असा अंदाज आहे. अनेक अर्थांनी यावर्षीचा पाउस हा चमत्कार दाखवणारा झाला आहे कारण गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पावसाची उणिव भरून काढली आहे. गेल्या दोन दिवसापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुुरु झाला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास आज महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचला आहे. बहुतेक उत्तरेकडील प्रदेश आता मान्सूनच्या प्रभावातून बाहेर आला आहे.
महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी काल गणेशविसर्जन मिरवणुकीच्या वेळी पावसानेही श्रीगणेशाला सचैल स्नान घालून निरोप दिला. आजही राज्यभर अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे. सध्या ओरिसा व प.बंगालमध्ये चक्राकार वादळे सुुरु असल्याने महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचा मुक्काम अजून दोन दिवस तरी राहील, अशी अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षापैकी नऊ वर्षांचा अनुभव असा की, मुख्य मान्सून संपला की पुन्हा म्हणजे दि.1 ऑक्टोबरनंतर अजून एक छोटा मान्सून सुरु होतो. त्याकडे निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
हवामान खात्याने दि.18 ऑक्टोबररोजी जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या पावसाच्या स्थितीच्या नकाशानुसार महाराष्ट्राच्या बावीस जिल्ह्यात आजच वीस टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे आणि बारा जिल्ह्यात एक टक्के ते वीस टक्के येवढा जादा पाउस झाला आहे. त्यात पुणे जिल्हयात 27 टक्के जादा पाऊस, नगर जिल्ह्यात एकतीस टक्के, धुळे जिल्ह्यात 56 टक्के पाऊस, अकोला 56 टक्के, गडचिरोली 54 टक्के, गडचिरोली 47 टक्के, नागपूर 44 टक्के, बुलढाणा 45 टक्के, गोंदिया 46 टक्के अशी स्थिती आहे. पुढील बारा दिवसातील पावसाची सरासरी शक्यता गृहीत धरून यात थोडा फार फरक पडू शकतो पण सर्वसाधारणपणे यावर्षीच्या मान्सूनचे चित्र स्पष्ट झाले आहे.
