मुंबई बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल

मुंबई – मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कपाऊंडच्या आवारात 22 ऑगस्ट रोजी महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सहाशे पानी आरोपपत्र दाखल केले आहे. 28 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी किल्ला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

किल्ला न्यायालयाने हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे हस्तांतरीत केले असून, सत्र न्यायालय आरोप निश्चित करणार आहे. सत्र न्यायालयात यावर 23 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.शक्ती मिलच्या आवारात महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली होती. या बलात्काराच्या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. मात्र परिस्थिती जन्य पुरावे आणि 86 साक्षींच्या आधारावर आम्ही पाचही आरोपींविरोधात भक्कम केस बनवली आहे असे गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी सांगितले.

22 ऑगस्ट रोजी मित्रासमवेत शक्ती मिलमध्ये छायचित्रे काढण्यासाठी गेलेल्या महिला छायाचित्रकारावर कासीम बंगाली, मोहोम्मद सलीम अन्सारी, विजय जाधव, सिराज रहमान खान आणि एका अल्पवयीन आरोपीने मिळून बलात्कार केला होता.

पोलिसांनी आरोपीवर 376 (सामूहिक बलात्कार), 377 (अनैसर्गिकशरीरसंबंध), 201(पुरावे नष्ट करणे), 120 ब (कट रचणे) अशी कलमे लावली आहेत. गुरुवारी या आरोपींची न्यायालयीन कोठडी संपणार आहे. पोलिस यातील तीन आरोपींची 31 जुलैला भांडूपमधील टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी कोठडी मागण्याची शक्यता आहे. या तरुणीवरही शक्ती मिलच्या आवारात बलात्कार झाला होता.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकिल आणि पोलिसांमध्ये गुरुवारी सकाळी आर्थररोड कारागृहात वादावादी झाली. पोलिसांनी आरोपींचे वकिल मोईन खान आणि अंजली यांना आरोपींना भेटण्याची परवानगी नाकारल्याने त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांच्या या निर्णयाविरोधात मोईन खान बार कौन्सिलकडे तक्रार करणार आहेत. या प्रकरणी लवकरच किल्ला न्यायालयात पोलिस आरोपपत्र दाखल करणार आहेत.