राजस्थानातील मंत्री नागर यांचा राजीनामा

जयपूर – विवाहीत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले राजस्थानचे मंत्री बाबूलाल नागर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजस्थान सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असणारे 53 वर्षीय नागर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला आपला राजीनामा पाठवून दिला आहे.

11 सप्टेंबर रोजी नागर यांनी नोकरी देण्याच्या बहाण्याने आपल्याला त्यांच्या निवासस्थानी बोलवले व आपल्यावर बलात्कार केला असा आरोप पिडित महिलेने केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा देत आहे. कोणीही मला राजीनामा द्यायला सांगितलेला नाही. माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत असून, या प्रकरणात मी अजिबात दोषी नाही असे नागर यांनी राजीनामा देताना पत्रकारांना सांगितले.

महिलेच्या तक्रारीवरुन सोडला पोलिस स्थानकात नागर यांच्या विरोधात बलात्कार, धमकावणे आणि मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागर यांनी राजस्थानमधील दुसरी भंवरी देवी बनवण्याची धमकी दिल्याचा आरोपही पिडित महिलेने केला आहे. भंवरी देवीचे राजस्थान सरकारमधील एका मंत्र्याशी अनैतिक संबंध होते. हे प्रकरण डोईजड झाल्यानंतर या मंत्र्याने भंवरी देवीची हत्या घडवून आणली होती.

राजस्थानचे मुख्यमंत्री बारमेर येथे कार्यक्रमासाठी गेले आहेत त्यांना नागर यांच्या राजीनाम्याची कल्पना नाही असे मुख्यमंत्री कार्यालयातील मोहोम्मद यासीन यांनी सांगितले.