नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर या निवडणुकांसाठी आखल्या जात असलेल्या रणनितीने वेग पकडला आहे. देशाचा पंतप्रधान ठरविण्यास सर्वाधिक कळीचा असलेल्या उत्तर प्रदेशात मोदींचा झंझावाती प्रचार दौरा आयोजित करण्यात येत असून नवरात्रीनंतर त्याची सुरवात होईल असे समजते. मोदींचे निकटवर्ती व उ.प्रदेशचे प्रभारी अमित शाह यांनी या संदर्भात दिल्लीत राजनाथसिग यांनी भेट नुकतीच घेतली असल्याचेही वृत्त आहे.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. मुझफ्फर नगरमधील दंगलीमुळे सध्याच्या सपा सरकारविरोधात जनमानस तयार झाले आहे. मोदींची लोकप्रियता कॅश करण्यासाठी भाजपने उत्तरप्रदेशावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहेच पण उत्तर प्रदेशातूनच मोदी लोकसभा निवडणूक लढतील असेही सांगितले जात आहे. गांधी कुटुंबाच्या हक्काच्या सीट याच राज्यात आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी यांनीही लखनौ मतदारसंघातूनच विजय मिळविला होता. मात्र उत्तर प्रदेशातून निवडून येऊन पंतप्रधानपदावर बसलेले अटलजी भाजपचे एकमेव खासदार आहेत.
मोदींची लखनौतील सभा डिसेंबरमध्ये होत असून त्या सभेला माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यापेक्षाही अधिक जनसमुदाय जमावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशाची विभागणी सोयीसाठी आठ विभागात करण्यात आली असून या सर्व विभागात मोदींच्या सभा होणार आहेत.