अफझल गुरूच्या पुस्तकाने वातावरण तंग

जम्मू – संसदेवरील हल्ला प्रकरणात दोषी ठरविल्या गेलेल्या अफझल गुरूची फाशी अमलात येऊन सात महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर त्याचे एक पुस्तक काश्मीरमध्ये प्रकाशित करण्यात आले असून त्यामुळे येथील वातावरण तंग झाले आहे. या पुस्तकाच्या पाच हजार प्रती छापून वितरीत करण्यात आल्या असल्याचेही समजते. उर्दू भाषेतील या पुस्तकाचे संपादन शफी अहमद खान यांनी केले आहे.

अफझलने लिहिलेल्या या पुस्तकाचे नांव अहले इमान के नाम शहीद मोहम्मद अफझल गुरू का पैगाम असे आहे. संपादकाच्या मते तिहार जेलमध्ये असतानाच गुरूने काश्मीरी जनतेसाठी संदेश दिला होता. संसद हल्ला प्रकरणात ११ वर्षे तिहार जेलमध्ये काढल्यानंतर ७ फेब्रुवारीला अफझलला फाशी दिली गेली. या पुस्तकात अफगाणिस्तानात संयुक्त फौजा आणि अमेरिका विरोधात तालिबान्यांनी केलेल्या मुकाबल्याचे गोडवे गायले गेले आहेत तसेच तालिबानी नेता मुल्ला मुहम्मद उमर याची तारीफही केली गेली आहे. ९४ पानाच्या या पुस्तकात उमरचे नेतृत्त्व म्हणजे तालिबान्यांना अंधारातील आशेचा किरण असल्याचेही अफझलने म्हटले आहे.