मोदींच्या निवडीचा मला आनंदच- आडवाणी

कोरबा – गुजरातला विकासाच्या वाटेवर नेण्यात मुख्मंत्री नरेंद्र मोदीं यांचा सिंहाचा वाटा आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाल्याने मी आनंदीत झालो आहे, असे मत व्यक्त करत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षातंर्गत वादावर पडदा टाकला आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यालत आले होते. या बैठकीला आडवाणी हे गैरहजर होते. मोदींच्या निवडीमुळे नाराज असल्याने ते बैठकीला गैरहजर राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. सोमवारी छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात लालकृष्ण आडवाणी हे प्रमुख वक्ते होते. मोदींच्या निवडीनंतर आडवाणींची ही पहिलीच जाहिर सभा असल्याने आडवाणी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यावेळी आडवाणींनी मोदींच्या कामाचे भरभरुन कौतुक केले. मोदींनी गुजरातला विकासाच्या वाटेवर नेले. गुजरातमधील वीजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. तसेच मोदींच्या निवडीवर मी खूश असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे मोदींना पक्षांतर्गत होणारा विरोध आता मावळल्याचे दिसत आहे.