वॉशिग्टन – सिरीयातील बंडखोरांना अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. संघर्षग्रस्त सिरीयात अमेरिकेची भूमिका बळकट व्हावी यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने आखलेल्या योजनेनुसार ही शस्त्रे बंडखोरांना पुरविली जात असल्याचे सांगितले जात आहे. या शस्त्रांसोबत वाहने, अत्याधुनिक दळणवळणाची उपकरणे आणि चिकित्सा कीट ही बंडखोरांना देण्यात येत आहेत.
गेले दीड वर्ष सिरीयातील बशर अल असद सरकाराविरोधात बंडखोर लढत आहेत. अमेरिकेकडून मिळालेल्या शस्त्रांमुळे हा लढा अधिक तीव्र करणे बंडखोरांना शक्य होणार आहे. अमेरिकेकडून सध्या बंडखोर नेते सलीम इद्रीस यांच्या गटाला शस्त्रे पुरविली जात असल्याचेही समजते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी एप्रिलमध्येच कांही आठवड्यातच सिरीयातील बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले होते. बंडखोरांना पुरविली जात असलेली शस्त्रे तुर्कस्तान आणि जॉर्डन येथील अमेरिकी तळांमार्फत पुरविली जात आहेत.