ग्रँड मस्ती

अ‍ॅडल्ट काँमेडीच्या विषयाला नाक मुरडण्याचे दिवस बॉलिवुडने मागे टाकले आहेत. क्या कुल है हम, मस्ती, क्या सुपरकुल है हम या चित्रपटांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे ते म्हणजे 2004 साली आलेल्या मस्तीचा सिक्वेल ‘ग्रँड मस्ती’. चित्रपटाविषयी पुर्वकल्पना असल्याने आपल्याला काय बघायला आणि ऐकायला मिळणार आहे या विषयी फार वेगळ्या अपेक्षा नव्हत्याच त्यातच चित्रपटाला कथानक दमदार नसल्याने ही मस्ती ग्रँड ठरत नाही.

इंद्रकुमार दिग्दर्शित ‘ग्रँड मस्ती’ ही तीन मित्रां भोवती फिरणारी कथा आहे. लेखक मिलाप झवेरी आणि तुषार हिरानंदानी यांनी मस्तीचीच स्टोरीलाईन इथेही कायम ठेवली आहे. कॉलेजमधुन बाहेर पडलेले तीन मित्र आता विवाहीत आहेत मात्र विवाहनंतर त्यांच्या आयुष्यातील त्यांना अपेक्षीत असलेली मस्ते करायला मिळत नाही, त्यामुळे तीघेही आपल्या वैवाहीक आयुष्याला कंटाळले आहेत. नाविन्याच्या शोधात ते असतानाच त्यांना कॉलेजच्या स्नेहमेळाव्याचे निमंत्रण येते. कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आयुष्यात पुन्हा एकदा धमाल करायची असा निश्‍चय करून हे तिघे जातात आणि ठरल्या प्रमाणे धमाल करतात.

या सिक्वेलचा पहिला भाग अर्थात मस्ती हा चित्रपट आठवला तर त्यात ब-याच प्रमाणात मस्ती होती. इतकेच नाही तर त्यात एक कथासुद्धा होती. मात्र या चित्रपटात कथानकाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. चित्रपटाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या लेक्चरने होते. आजवर आपण जी चुकीची बाराखडी शिकलो ती कशी चुकीची आहे, यावर त्यांची चर्चा होत असते. ए, बी, सी, डी चा खरा अर्थ काय तर म्हणे स्त्रीयांचे विविध अवयव/ अशाप्रकारे पुढची बाराखडी म्हणताना कॅमेरा स्त्रियांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर फिरतो. चित्रपटातील सर्वच संवाद खालच्या स्तराचे आहेत. या संपूर्ण चित्रपट द्विअर्थी संवादाने आणि अंगविक्षेपांनी ठासून भरलेला आहे.

चित्रपटात दाखविलेले प्रसंग, विनोद हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याातही चर्चेचा विषय असतो मात्र ते एका विशिष्ट मर्यादेत, त्याच्या पुढे त्या प्रकारच्या विनोदाला स्थान नसते इथे मात्र त्यासाठीच सर्वकाही असे मांडण्यात आले आहे. महाविद्यालयीन तरूणाईला डोळ्यासमोर ठेओन कथानकाची मांडणी करण्यात आली आहे, चित्रपटातील अश्लील गोष्टींवर युवक हसतील. न्यूड पुरुष किंवा स्त्री-पुरुषांवर करण्यात येणार्‍या विनोदावर त्यांना हसू येऊ शकतं. मात्र , आपल्याला ज्या गोष्टींवर हसू येत त्या प्रत्येकात विनोद असतोच, असे नाही.

चित्रपटाला कथानकच नसल्याने हा चित्रपट फक्त द्विअर्थी विनोदाची साखळी उभा करतो, अभिनयाच्या नावाखाली रितेश देशमुख, अफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय फक्त अश्‍लिल अंगविक्षेप करतात. सहा नायीकांचा भरणा असला तरी त्यांची अवस्था म्हणजे एक ना धड भारभ चिंध्या अशीच आहे. चित्रपटाल दोन संगीतकार असले तरी एकही गाण लक्षात राहत नाही. एकंदरीत अश्‍लिल विनोदाची ही अ‍ॅडल्ट कॉमेडी एक्सप्रेस बघायला हवी अशी नाही.

चित्रपट – ग्रँड मस्ती
निर्मिती – अशोक ठाकरिया, इंद्र कुमार
दिग्दर्शक – इंद्र कुमार
संगीत – आनंद राज आनंद, संजिव – दर्शन
कलाकार – रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी, मंजरी फडणीस, सोनाली कुलकर्णी.

रेटिंग – * *

 

Leave a Comment