न्यूयॉर्क – अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताचा लिएंडर पेस आणि झेक प्रजासत्ताकचा त्याचा जोडीदार रॅडेक स्टेपनेक यांनी अंतिम फेरीत धडक मारली. महिला दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि चीनच्या जी झेंग यांनी धडक मारली आहे. या दोघींनी विजय मिळवीत महिला दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
पुरुष दुहेरीतील अमेरिकेच्या माइक आणि बॉब ब्रायन बंधूंची मक्तेदारी लिएंडर- रॅडेक मोडीत काढताना ०-१ अशा पिछाडीवरून पेस-स्टेपनेक जोडीने ही लढत ३-६, ६-३, ६-४ अशी जिंकून ऐतिहासिक शिखर गाठले. अवघ्या २९ मिनिटांत पहिला सेट जिंकणा-या ब्रायन बंधूंना दुस-याे सेटमध्ये पेस-स्टेपनेकने कडवी टक्कर दिली. या दोघांनी आक्रमणात भर टाकत दुसरा आणि तिसरा सेट अनुक्रमे ३७ आणि ४५ मिनिटांत खिशात घालून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
भारताची सानिया मिर्झा आणि चीनच्या जी झेंग यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दहावी मानांकित सानिया-झेंग जोडीने आपल्यापेक्षा अधिक चौथ्या मानांकित चीन-तैपेईची सू वी सी आणि चीनची शुआई पेंग या जोडीला एक तास आणि ५० मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-४, ७-६ ने मात दिली. आता सेमीफायनलमध्ये सानिया-झेंगचा सामना आठवी मानाकिंत ऑस्ट्रेलियाची अॅनश्ले बार्टी आणि कॅसी डेलाक्युआ या जोडीशी होईल. यूएस ओपनमध्ये सानिया मिर्झा पहिल्यांदा सेमीफायनलपर्यंत पोहोचली आहे. सानियाने आतापर्यंत चारही ग्रँडस्लॅममध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे.