मुंबई – काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी मुंबईतील गुजराती समाजाबद्दल केलेल्या विधानांसंदर्भात बिनशर्त जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा गुजराती समाजाने दिला आहे. गुजराती समाज नरेंद्र मोदींची उघडपणे स्तुती करत आहे. इतकेच नाही तर त्यांनी आता थेट स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंना आव्हान दिले आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या गुजराती समाजाबद्दल राणेंनी केलेली विधाने गुजराती भाषिकांना खटकली आहेत. याप्रकरणी राज्य सरकार दरबारी न्याय मिळत नसल्याने, अखेर नितेश राणेंवर कारवाईसाठी गुजराती समाजाने गुजरात विकास मंचच्या माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे. गुजरात विकास मंचने जुहू पोलीस ठाण्यात राणेंविरोधात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवर सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास तसेच राणेंनी गुजराती समाजाची बिनशर्त जाहीर माफी न मागितल्यास न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय पदाधिका-यांनी घेतला आहे. याची माहिती, गुजरात विकास मंच पदाधिकारी जास्मीन शहा यांनी दिली.
गुजराती समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता थेट विधानभवनात आवाज उठवण्याचीही तयारी सुरु केली आहे. गुजरात विकास मंचने विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे, तसे जास्मीन शहा यांनी स्पष्ट केले.