पंढरपूरमध्ये अपहरण केलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

सोलापूर : पंढरपूरजवळ शेगाव दुमाला येथून मंगळवारी अपहरण करण्यात आलेल्या पाच वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. संकेत अटकळे असे या बालकाचे नाव आहे. संकेत हा शेगावदुमाला गावातील अटकळे या सधन शेतकरी कुटुंबातील मुलगा ३ सप्टेंबरला खेळताना अचानक गायब झाला होता. एका महिलेने संकेतचे अपहरण केल्याचे निदर्शनाला आले होते. याप्रकरणी या महिलेची पोलिसांनी कसून तपासणी सुरु केली आहे.

तीन दिवसांपूर्वी संकतेच्या अपहरणानंतर खंडणीसाठी कुठलाही फोन आला नाही. त्यामुळे पोलिस बुचकाळ्यात पडले होते. त्यामुळे संकेतचे अपहरण नेमके कशामुळे झाले हे समजत नव्हसते. त्यातच आता शुक्रवारी गावाजवळील शेतात संकेतचा मृतदेह आढळून आला आहे. त्यासमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण आणखीनच वाढला आहे. हा खून आहे की अन्य काही प्रकार आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी संकेतचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. वैद्यकीय अहवालानंतर तपासाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.